औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना दिल्लीसाठी लवकरच नवीन साप्ताहिक रेल्वे मिळणार आहे. रेल्वे बोर्डाकडून नांदेड-निजामुद्दीन साप्ताहिक रेल्वे मंजूर करण्यात आली असून, या रेल्वेला मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे.ही रेल्वे दर मंगळवारी नांदेड येथून सकाळी ८ वाजता सुटेल, तर निजामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री ७.५० वाजता सुटेल. या रेल्वेला परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भोपाळ, झांसी, आग्रा, अंकई, खंडवा, पालवाल याठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे. या साप्ताहिक रेल्वेला ५ मार्च रोजी रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही रेल्वे लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने तारखेचे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या उपसंचालकांनी मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वेसह ही रेल्वे धावणाऱ्या विविध विभागांना एका पत्राद्वारे माहिती दिली आहे.आजघडीला दिल्लीसाठी एकमेव सचखंड एक्स्प्रेसचा प्रवाशांना आधार मिळत आहे; परंतु या रेल्वेचे तीन-तीन महिने आरक्षण फुल असते. त्यामुळे गर्दीतूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली, मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी मराठवाड्यातून होत होती. अखेर दिल्लीसाठी साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
दिल्लीसाठी लवकरच नवीन साप्ताहिक रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:31 PM