वाळूज महानगर : वाळूज महानगरसह परिसराला दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे पिकांची नासाडी झाली असून, कापूस, गहू व कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे काढणीला आलेली पिके जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.आजवर भल्या-भल्यांना निसर्गाचा अंदाज आलेला नाही. वाळूज महानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे या भागातील पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, वाळूज, वळदगाव, नायगाव, कमळापूर, शिवराई, रांजणगाव शेणपुंजी, धामोरी, लांझी, तीसगाव, रामराई, टेंभापुरी इ. भागांतील गहू, कांदा, तूर, मिरची, कापूस या पिकांबरोबरच आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रबीच्या पेरणीत पावसाने ऐन वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. दुबार पेरणी करूनही पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला. अपुऱ्या पावसातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके जगविली; परंतु निसर्गच शेतकऱ्यांवर कोपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे रोगराई पडून पिकांची मोठी नासाडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा व कोवळा गहू पिवळा पडत आहे. मिरचीची फुले व आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला आहे. कापसाची बोंडे खाली गळत असून कापसाच्या वाती झाल्या आहेत. तुरीचे पीक काळे पडत आहे. अनेक भागातील मोहरीचे पीक भुईसपाट झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे. निसर्गाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे काढणीला आलेले पीक हातून जात असल्याने व कोवळ््या पिकाची जागेवरच नासाडी होत असल्याने कर्जबाजारी झालेला शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, कापूस, मिरची या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे राजू शेळके, अशोक बुट्टे, विष्णू शेळके, राजू कालसनकर, लिंबाजी शेळके, रामेश्वर नवले, कल्याण घुले, शिवाजी घुले या शेतकऱ्यांनी सांगितले.
नववर्ष दिनी अवकाळीची सलामी
By admin | Published: January 02, 2015 12:37 AM