औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने ३७ कोटी रु. खर्च करून १०० बसेस खरेदी केल्या. बस चालविणे, प्रवाशांकडून तिकीट वसूल करण्यासाठी कुशल मनुष्यबळ नव्हते. एसटी महामंडळाकडून पाच वर्षांसाठी मनुष्यबळ घेण्यात आले. हा करार लवकरच रद्द करून बससेवा स्वतंत्रपणे चालविण्याचा मनोदय स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे शहर बससेवा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कारण नसताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पांडेय यांनी नमूद केले की, नवीन वर्षात महापालिका व स्मार्ट सिटीची यंत्रणा बससेवा स्वतंत्रपणे चालवण्याचा विचार करेल, त्या दृष्टीने नियोजनदेखील केले जात आहे.
एसटी महामंडळाच्या स्वत:च्या काही समस्या आहेत, मर्यादा आहेत. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. स्वतंत्रपणे बससेवा चालवण्याचे सूतोवाच करून पांडेय यांनी एसटीसोबत केलेला सामंजस्य करार रद्द केला जाणार असल्याचे संकेत दिले. एसटीसोबतचा करार रद्द होणार का, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, २०२२ या वर्षात बस स्वतंत्रपणे चालवली जाईल, हे निश्चित.