औरंगाबाद : पचण्यास सुलभ व आरोग्यास लाभदायक असलेल्या ज्वारीची सध्या चक्क ४८ रुपये किलोने विक्री होत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्वारीला मिळालेला हा सर्वोच्च भाव होय. या उच्चांकी किमतीमुळे हलक्या ज्वारीलाही भाव आला आहे. ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे लक्षात आल्याने या चढ्या भावातही ज्वारी खरेदी केली जात आहे. औरंगाबाद शहरात दर आठवड्याला १०० ते १५० टनदरम्यान ज्वारी विकल्या जाते. यावरून ज्वारीला वाढत्या मागणीचा अंदाज येऊ शकतो.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याच्या घाऊक दुकानात ४२०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी विक्री होत आहे. २०१८ मध्ये दुष्काळामुळे ज्वारीचा पेरा कमी झाला होता. जेथे पीक आले तेथे अवकाळी पावसाने ज्वारी काळी पडली. परिणामी मार्च-एप्रिल २०१९ मध्ये नवीन शाळू ज्वारी ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली. जूनपर्यंत भाव स्थिर होते. त्यानंतर आॅगस्टमध्ये खान्देशातून हायब्रीड ज्वारी बाजारात आली, पण कमी उत्पादनामुळे सुरुवातीला २८०० ते ३२०० रुपये व नंतर भाव वाढून ३२०० ते ३५०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाली. याशिवाय आॅगस्ट महिन्यात कर्नाटकची दुरी ज्वारी बाजारात येत असते, पण तेथेही कमी उत्पादन झाले. परिणामी, ज्वारीचे भाव वाढतच गेले. मागील ९ महिन्यांत क्विंटलमागे शाळू ज्वारी १००० ते १२०० रुपयांनी वधारली.
ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, पांढऱ्या रंगाची असते. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) ८ ते १० टक्के असते. कर्बोदके, ऊर्जा, तंतूमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे ती शक्तिवर्धक आणि पचण्यास सुलभ असते. एवढेच नव्हे तर ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगितल्या जाते. यामुळे ज्वारीला वर्षभर मागणी असते. होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी ज्वारी ही गरिबाची मानली जात होती. त्यावेळी १६०० ते १८०० रुपये क्विंटल ज्वारी विकल्या जात होती. मात्र, ज्वारीवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आणि ज्वारीची महती सर्वांना कळली. जनजागृती झाल्याने अनेकांनी दररोजच्या आहारात गव्हाच्या पोळीसोबत ज्वारीची भाकरी खाणे सुरू केले.
एवढेच नव्हे तर हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, खानावळीवाल्यांकडूनही ज्वारीला मोठी मागणी आहे. यामुळे ज्वारीच्या भाववाढीला आणखी बळ मिळत आहे. परिणामी, यंदा मराठवाड्यातही रबी ज्वारीचे क्षेत्र २० टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात नवीन ज्वारी बाजारात येईल, यामुळे आता ज्वारीच्या भावात जास्त वाढ होणार नाही, असेही होलसेलरने सांगितले.
पशुखाद्याच्या ज्वारीच्या भाकरी विक्रेत्यांनी सांगितले की, पूर्वी हलक्या प्रतीच्या ज्वारीला कोणी हात लावत नव्हते. ही ज्वारी पशुखाद्यासाठी विकली जात असे. मात्र, यंदा ज्वारीचे भाव उच्चांकावर जाऊन पोहोचले. यामुळे पशुखाद्यासाठी असलेली ज्वारीही २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली. एवढी महाग ज्वारी खरेदी करणे पशुमालकांना परवडत नाही. मात्र, अनेक ग्राहकांनी उच्चप्रतीच्या ज्वारीपेक्षा कमी भावातील हलक्याप्रतीची ज्वारी खरेदी करणे सुरू केले. यामुळे पशुखाद्यासाठीच्या ज्वारीलाही मागणी वाढली.
गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागलानववर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर १९ रुपयांनी महागला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. बुधवारी १९ रुपयांनी अनुदानित सिलिंडर महागला असून, ७१० रुपयांप्रमाणे (१४.२ किलो) विकण्यात आला. तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही वाढ होऊन १२७० रुपये (१९ किलो) दर झाला आहे. ही दरवाढ म्हणजे महागाईत तेल ओतण्याचे काम असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
कांद्यानंतर बटाटे महागलेकांद्यानंतर आता बटाट्याचे भाव कडाडण्यास सुरुवात झाली आहे. भाजीमंडईत ४० रुपये किलोने बटाटा विकले जात आहे. औरंगाबाद शहरात दररोज ४० ते ५० टन बटाटा विकला जातो. जुना बटाटा ३० ते ३२ रुपये किलोने विकल्या जातो. नवीन बटाटा ४० रुपये किलो विकत आहे. अडत बाजारात उच्च प्रतीचा बटाटा सध्या येत नाहीत. तो इंदूरमध्येच ३५ रुपये किलो दराने विकाला जातो. यामुळे येथे दुय्यम प्रतीचा बटाटा येतो.