औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नवजात शिशू सुपर स्पेशालिटी कोर्स सुरू करण्यासाठी ‘एमसीआय’कडून मंगळवारी हिरवा कंदिल मिळाला. ‘एमसीआय’ने डीएम न्युनेटोलॉजीच्या एका पदाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी दिली आहे. राज्यात हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा पहिला मान घाटी रुग्णालयास मिळाल्याचे विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे सुपर स्पेशालिटी डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे किमान नवजात अर्भकशास्त्रसह चार विषयांच्या सुपर स्पेशालिटीसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविण्याचा आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय अभ्यागत समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी ‘एमसीआय’कडून नुकतीच पाहणी करण्यात आली होती. डीएम न्युनेटोलॉजीच्या पदाच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळावी, यासाठी ही पाहणी करण्यात आली होती. अखेर हा सुपर स्पेशालिटी कोर्स सुरू करण्यासाठी एका जागेला मंगळवारी मंजूरी मिळाली.
नवजात शिशू सुपर स्पेशालिटी सुरू करण्यासाठी परवानगी मिळणे हे नवजात अर्भकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यातून बालमृत्यू दर कमी करण्यासाठी मोठे योगदान मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.