औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी वॉर्डाकडे पायी जाणाऱ्या महिलेची वाटेतच प्रसूती होऊन नवजात बाळ फरशीवर आदळून दगावल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेच्या वेळी संबंधित महिलेला स्ट्रेचरवरून वॉर्डात नेण्यात येत असते, तर बाळ दगावले नसते, असे घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा घाटीतील स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याच्या कामातील हलगर्जीपणा उघडा पडला आहे.
छावणी परिसरातील महिलेला सोमवारी रात्री प्रसूतिकळा सुरू झाल्या. तेव्हा कुटुंबियांनी महिलेला प्रारंभी छावणी रुग्णालयात नेले. याठिकाणी महिलेला प्रसूतिकळा नसल्याचे सांगून दोन गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर सदर महिलेला कुटुंबियांनी रात्री १ वाजेच्या सुमारास घाटीत आणले. वाहनातून उतरून ते अपघात विभागात पोहोचले. प्रसूतिकळांनी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत कुटुंबियांनाही काय करावे, ते सुचत नव्हते. स्ट्रेचरवरून वॉर्डात नेता येईल, हे कोणाला सुचलेही नाही. प्रसूतीसाठी महिलेला घेऊन ते पायीच निघाले.
अपघात विभागातून काही पायऱ्या चढून समोरील व्हरांड्यातील लिफ्टपर्यंत पोहोचत नाही तोच महिलेची अचानक प्रसूती झाली आणि नवजात बाळ थेट फरशीवर पडले. या घटनेनंतर एकच धावपळ सुरू झाली. घटनेनंतर अनेकांनी मदतीसाठी धावाधाव केली. एका परिचारिकेने बाळ वेगळे करीत त्यास प्रसूती कक्षात हलवले; परंतु तोपर्यंत ते दगावले होते.
बाळ दगावलेले होतेस्ट्रेचरवरून वॉर्डात नेताना जर प्रसूती झाली असती, तर बाळ खाली पडले नसते. त्यामुळे स्ट्रेचरचा वापर केला असता तर ते सुखरूप राहिले असते, असे घाटीतील एका डॉक्टरांनी सांगितले. बाळ खाली पडले, याची माहिती आम्हाला नाही; परंतु बाळ मृत होते, असे प्रसूतिशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.
महिलेला सांगितले बाळ काचेत ठेवले आहेया घटनेतील महिलेला बाळ दगावल्याची कल्पना कुटुंबियांनी मंगळवारी दुपारपर्यंतही दिलेली नव्हती. बाळ काचेत ठेवलेले आहे, असेच कुटुंबियांनी तिला सांगितले होते. प्रसूतीसाठी पायी जाताना बाळ खाली पडले आणि दगावले. अपघात विभागातून स्ट्रेचर घेण्याचे सुचले नाही; परंतु बाळ पडल्यानंतर सर्व जण आले, अशी वेळ कोणावरही येऊ नये, असे महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले.
चौकशी करण्यात येईल महिला प्रसूतीसाठी उशिराने येतात. या घटनेत नेमके काय सुरू आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. स्ट्रेचरसंदर्भात काय झाले, याचीही माहिती घेतली जाईल.-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
नातेवाईकांची तक्रार नाहीसदर महिला प्रसूतिगृहात आली तेव्हा तिची वॉर्डाखालीच प्रसूती झालेली होती. प्रसूतीनंतर बाळ दगावलेले होते. नातेवाईकांनी काहीही तक्रार केलेली नाही.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूतिशास्त्र विभाग