ससो खंडाळकर
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून शिवसेनेला धडकी भरवणारी सभा असेच वर्णन ‘राज’सभेचे करावे लागेल. पोलिसांनी १६ अटी-शर्ती लादल्याचा परिणाम राज ठाकरे यांच्या भाषणातून जाणवत होता. त्यामुळेच त्यांनी ना कुणाच्या नकला केल्या ना कुणाचे आवाज काढले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येऊन राज ठाकरे यांनी ना शिवसेनेचे नाव घेतले, ना उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना मात्र त्यांनी टार्गेट केले होते. त्यांच्यावर थेट जातीयवादाचा आरोप करीत शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच ॲलर्जी असल्याचे टीकास्त्र सोडले.
राज ठाकरे यांना ऐकायला आलेली पब्लिक आतुर दिसली. त्यांनीच आक्रमकपणे मांडलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर ते लवकर येतच नव्हते. पब्लिकमधून कुणीतरी आवाज काढला ‘भोंगा’.... येतो त्या मुद्द्यावर अो राज यांना म्हणावे लागले. शरद पवार यांच्यावरील टीकेपेक्षा लोकांना भोंग्याचा मुद्दा आवडलेला दिसला. मग राज ठाकरे शरद पवार यांना टार्गेट करण्यामागील राजकारण काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
ठाण्याच्या उत्तर सभेसारखी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरची सभा रंगली नसली तरी या सभेची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावर झालेल्या सभांशी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन सभा १९८८ साली या मैदानावर झाल्या होत्या. तीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी, तसाच जोष, जल्लोष यावेळी दिसला. शिवसेनेसाठी ही खरी डोकेदुखी ठरू शकते. राज ठाकरे यांच्या सभेतली गर्दी स्थानिक किती, बाहेरची किती, हाही चर्चेचा विषय होता. एका अर्थाने सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून गर्दी जमलेली.
राज ठाकरे यांच्या आधीच्या वक्त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांना टार्गेट केले होते. त्यांच्यावरची टीका लोकांना आवडत होती. या टीकेला खैरे-दानवे कसे उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ही सभा औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे शिवसेनेचे गणित बिघडवू शकते का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
सभेला ३० हजारांची गर्दी असल्याचा पोलिसांचा अंदाज
- मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मैदान खचाखच भरले होते.
- राज ठाकरे इतिहासावर बोलताना उपस्थितांनी प्रतिसाद दिला नाही, पण शरद पवार यांच्यावर बोलताच जल्लोष.
- भोंग्यावर बोलण्याची उपस्थितांतून मागणी.
- सभेला ३० हजार लोक आल्याचा पोलिसांचा अंदाज.