औरंगाबाद : शहर वाहतूक शाखेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशीही रोशनगेट ते चंपाचौक आणि चंपाचौक ते आझाद चौक रस्त्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील पान टपऱ्या, हातगाड्या, दुचाकी वाहने आणि शेड काढण्यात आले, अशा प्रकारची कारवाई गुरुवारीही शहरातील अन्य मार्गांवर केली जाणार आहे.पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार मंगळवारी रोशनगेट ते चंपाचौक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने, हातगाड्या, टपऱ्या हटविण्याची कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल यांनी काही वाहनांचे नुकसान केल्याने नागरिक संतप्त झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी परिस्थिती हाताळत ही कारवाई यशस्वी केली होती. या कारवाईला २४ तास उलटण्यापूर्वीच पुन्हा या मार्गाची परिस्थिती जैैसे थे बनली होती. वाहतुकीला अडथळा करणारी अनेक वाहने दुभाजकाच्या ठिकाणी उभी करण्यात आलेली होती. शिवाय टपऱ्या, रस्त्यावर विटा, वाळू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४ ते रात्री साडेसातपर्यंत रोशनगेट ते चंपाचौक आणि चंपाचौक ते आझाद चौक रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. रस्त्यावरील ४ कार,१५ दुचाकी उचलण्यात आल्या. १२ हातगाड्या, ५ पानटपऱ्या हटविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली. या कारवाईत वाहतूक शाखेचे निरीक्षक जी. डी. दराडे, पो.नि. बी. बी. शिंदे, सहायक निरीक्षक शेख अकमल, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, काठमांडे यांच्यासह ५० कर्मचारी सहभागी झाले होते, तर मनपा अतिक्रमण हटाव पथकाचे शेख मिस्कीन, सय्यद जमशीद यांनी सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणे काढली
By admin | Published: May 25, 2016 11:48 PM