पैठण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली; पण पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नाही. मात्र, गुरुवारी ५ ग्रामपंचायतींसाठी १४ जणांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध प्रमाणपत्रांची जमवाजमव करण्यासाठी उमेदवार धावपळ करताना दिसून आले.
पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पुढील तीन दिवस सुट्या असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्जांची गर्दी सुरू होईल.
गुरुवारी पैठण तालुक्यातील दादेगाव १, वडजी २, लोहगाव १, रांजणगाव दांडगा ८ आणि नायगाव २ अशा पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरताना १६ कागदपत्रे जमा करावी लागत असून उमेदवारांना अर्ज ऑनलाइन भरून त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात द्यावी लागत आहे. मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे, त्या पानाची सत्यप्रत, अनामत रकमेची पावती, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्याची छायांकित प्रत, मालमत्ता, दायित्व घोषणापत्र, अपत्ये दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र, जातप्रमाणपत्र, रोजचा खर्च सादर करण्यासंबंधीचे हमीपत्र, उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र, आधार कार्डाची झेरॉक्स, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसभेतील ठराव मंजुरीची प्रत आदी कागदपत्रे जोडावे लागत आहेत. संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे.
------ तीन दिवस सुट्या ----
या रणसंग्रामासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही नाही, तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी केवळ पाच ग्रामपंचायतींसाठी १४ अर्ज दाखल झाले. पुढील तीन दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुटी आहे. निवडणूक कार्यक्रमात सार्वजनिक सुटी वगळून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असा उल्लेख असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.