औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसंदर्भात मेअखेरपर्यंत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे शपथपत्र महापालिकेने खंडपीठात दाखल केले होते. मे महिना संपत आला तरी मनपात सर्वसाधारण सभा घेण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली नाहीत. मनपा प्रशासनाने विशेष सभा घेण्याबाबत महापौरांना कोणतीही विनंती केलेली नाही. त्यामुळे विशेष सभा होईल किंवा नाही, यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने मागील महिन्यात समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मनपाला दिले होते. मनपाने शासन आदेशानुसार नोटीस बजावली. कंपनीने नोटीसचे उत्तरही दिले. समांतरसंदर्भात सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेऊन अहवाल शासनाला पाठवावा, असेही नगरविकास विभागाने म्हटले आहे. दरम्यान, समांतर जलवाहिनीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिकेने न्यायालयात शपथपत्राद्वारे आश्वासन दिले की, मे महिना अखेरीस मनपा समांतरसंदर्भात विशेष सभेत अंतिम निर्णय घेणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीने दिलेल्या नोटीसच्या उत्तराचा अभ्यास केला. प्रशासनाचे वेगळे मत विशेष सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. मनपातर्फे सविस्तर ड्राफ्टही तयार करण्यात आला आहे. मात्र, मागील आठ दिवसांमध्ये विशेष सभा घेण्यासाठी कोणतीही हालचाल करण्यात येत नाही. महापौर त्र्यंबक तुपे यांना विशेष सभा घेण्यासाठी प्रशासनातर्फे कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. प्रशासनाने लेखी मागणी केल्यानंतरच महापौर विशेष सभेची तारीख जाहीर करणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेष सभेचे आयोजन करण्यात येऊ शकते, असे मनपा सूत्रांनी सांगितले. भाजप, एमआयएमचा विरोध समांतर जलवाहिनीसंदर्भात आमचा विरोध असल्याचे यापूर्वीच भाजप आणि एमआयएमने जाहीर केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोधाचीच भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने आजपर्यंत आपली भूमिका उघड केलेली नाही. विशेष सभेत मतदान घेण्याची वेळ आली तर एमआयएम आणि भाजप विरोधात मतदान करणार आहे. सेनेची भूमिका वेगळीच समांतरचे काम करणाऱ्या कंपनीला आज हाकलून लावल्यास भविष्यात पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न स्थानिक सेना नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कंपनीसोबत केलेल्या करारात अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा एकदा कंपनीला संधी देता येऊ शकते. सेनेच्या या भूमिकेला मनपा सभागृहात ‘मित्र’पक्ष किती साथ देतात हे लवकरच लक्षात येईल.
समांतरच्या सभेला बगल
By admin | Published: May 29, 2016 12:24 AM