औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक व इको निड्स फाउण्डेशनचे संस्थापक डॉ. प्रियानंद आगळे व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तत्कालीन प्रा. डॉ. पराग सदगीर यांनी रसायन, वीज व कोणत्याही यंत्राशिवाय सांडपाण्याचे शुद्धीकरण करता येते, अशी संशोधनाद्वारे पद्धत विकसित केली असून, त्यांच्या संशोधनाला भारत सरकारचे ‘पेटंट’ जाहीर झाले आहे.
प्रदूषित होत असलेल्या नद्या व जलसंपदा वाचविण्यासाठी तसेच सामान्य जनतेला स्थानिक साधनांचा सहज वापर करून सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी ही पद्धत वापरता येणार आहे. अल्प जागा व अल्प खर्चात घरगुती सांडपाणी, संस्थात्मक सांडपाणी, नद्या, नाले, शहर, गाव पातळीवरील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. यावर डॉ. आगळे यांच्या संशोधनावर भारत सरकारने २६ एप्रिल रोजी ‘जागतिक बौद्धिक संपदा हक्क दिनी’ शिक्कामोर्तब केले आहे.
प्रा. आगळे यांनी ‘सेल्फप्युरिफिकेशन बेस्ड पोल्युटेड वॉटर प्युरिफिकेशन’ या विषयावर डॉ. सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. पीएच.डी.ला सुरुवात करण्याअगोदरच त्यांनी या विषयाचे ‘पेटंट’ मिळण्यासाठी सन २०१६ मध्ये भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. परवा या विषयावर कोलकाता येथील बौद्धिक संपदा विभागाने डॉ. आगळे व डॉ. सदगीर यांची ‘ऑनलाइन’ मुलाखत घेतली व ‘पेटंट’ जाहीर केले.
या पद्धतीच्या माध्यमातून सांडपाण्यातील बीओडी ९० टक्के, फॉस्फरस ७७ टक्के, नायट्रेट ९३ टक्के, अमोनिया ९० टक्के, ऑइल अँड ग्रीस ८२ टक्के कमी करण्यास मदत होत असल्याचे सिद्ध झाले आहे.