औरंगाबाद : विविध कारणांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे द्वार खुले राहावे या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे निर्णय घेतला असून पुढील वर्षापासून विद्यापीठात स्वतंत्र मुक्त व दूरशिक्षण संस्था सुरू होणार आहे. सध्या जगभरात ‘ओपन लर्निंग’ आणि ‘डिस्टन्स एज्युकेशन’वर विविध विद्यापीठे भर देत आहेत. देशातील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो’(डीईबी) द्वारेही मुक्त व दूरशिक्षणाचा प्रसार करण्याचे काम करण्यात येते. त्यांच्या मान्यतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र मुक्त व दूरशिक्षण संस्था सुरूकरण्यात येणार आहे. सध्या विद्यापीठाने डीईबीकडे यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पुुढील वर्षापासून हे केंद्र सुरूराहील. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अशी संस्था स्थापन करण्याचा मानस वर्षभरापूर्वीच व्यक्त केला होता. मुक्त व दूरशिक्षण संस्थेसाठी संचालक म्हणून वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्ष संस्थेचे काम सुरू होईपर्यंतच्या काळात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुस्तके तयार करणे, ई बुक तयार करणे तसेच आॅनलाईन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गव्हाणे यांनी दिली. शिक्षणाच्या विद्यापीठाचे चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या संस्थेसाठी असेल. मराठी व इंग्रजी भाषेत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. अशी संस्था सुरू करण्यासाठी पाच केंद्र आणि पाच अभ्यासक्रम हवे आहेत. सर्व प्रक्रिया आठ ते दहा महिन्यांत पूर्ण करून पुढील वर्षापर्यंत हे केंद्र सुरू होणार आहे. मनुष्यबळ आणि इतर बाबी या काळात पूर्ण केल्या जाणार आहेत. मराठवाड्यात आर्थिक -सामाजिक कारणांमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी या केंद्रामुळे संधी प्राप्त होणार आहे.
पुढील वर्षापासून विद्यापीठात स्वतंत्र मुक्त व दूरशिक्षण संस्था
By admin | Published: July 08, 2016 11:47 PM