छत्रपती संभाजीनगर : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन मुख्य संशयितांच्या संपर्कात शहरातील तीन तरुण असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एनआयए व दिल्ली पोलिसांचे पथकाने हर्सूल परिसरातील तीन तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन लॅपटॉप, मोबाईलसह ते वापरत असलेले अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ते संशयितांच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
जवळपास ८ तास चौकशीनंतर नोटीस बजावून पथक रवाना झाले. १ मार्च रोजी बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट होऊन ११ जण गंभीर जखमी झाले होते. आयईडी टायमर वापरून हा बॉम्बस्फोट करण्यात आला. या स्फोटाचा संबंध इसिस या दहशतवादी संघटनेसह बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी जोडला गेला. सतरा दिवसांपूर्वी यात मुख्य संशयित मुसावीर हुसेन शाजीब (रा. तीर्थहल्ली, कर्नाटक) सह त्याचा साथीदार अब्दुल मतीन शहा या दोघांचेही नाव निष्पन्न झाले. एनआयएच्या दाव्यानुसार, ताहा व मुसावीर दोघेही आयएसआयएसशी संबंधित आहेत. आयएसआयच्या संपर्काच्या असलेल्या अटकेतील आरोपींच्या चौकशीत देखील या दोघांचे नाव उघडकीस आले होते.
एकाच वेळी ७ राज्यांत १७ ठिकाणी छापेकाही दिवसांपूर्वी एनआयएने मुज्जफल शरीफ यास अटक केली. त्याच्यावर या स्फोटासाठी रसद पुरवल्याचा ठपका आहे. त्याच्या चौकशीदरम्यानच एनआयएने ७ राज्यांतील १७ ठिकाणी छापे टाकले. त्यात बंगळुरूमधीलच टी नझीरच्या घरावर छापा टाकला. नझीरवर यापूर्वी हवाला व्यवहाराचा गुन्हा दाखल आहे. त्याच तपासादरम्यान देशातील अनेक ठिकाणांवरुन हवाला व क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याचे पुरावे हाती लागले. त्यात शहरातील मयूर पार्क मध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाचे धागेदोरे मिळाले. एनआयएने तत्काळ दिल्ली पोलिसांसह तिघांच्याही घरी छापा टाकत कसून चौकशी केली. त्यातील एकाने पुण्यातील बीबीएचे शिक्षण सोडले आहे, तर दुसरा बारावी उत्तीर्ण आहे. तिघांपैकी एकाने बॉम्बस्फोटातील काही संशयितांसोबत क्रिप्टोकरन्सी व्यवहार केल्याचा दाट संशय आहे.
प्रवास, पार्श्वभूमीचा तपासएनआयएच्या या कारवाईनंतर स्थानिक एटीएस पथकदेखील सक्रिय झाले. त्यांनी देखील या तिघांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप व अन्य वापरत असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य एनआयएने जप्त केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून कसून पाळत ठेवली जाणार आहे. तिघांचा सोशल मीडियावरील वावर, काही राजकीय, संघटनांची पार्श्वभूमी आहे का, गेल्या चार ते पाच महिन्यांत कुठे प्रवास केला, या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुन्हा दहशतवादाचे सावटबंदी घातलेल्या एका संघटनेचे शहरात पाळेमुळे पसरल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणांचे कायमच शहरातील हालचालींवर विशेष लक्ष राहिले आहे. अफगाणिस्तानमार्गे सिरियाला जाऊन इसीस मध्ये सहभागी होण्यापूर्वीच एनआयएने हर्सूलमध्ये राहणाऱ्या मोहम्मद झोहेब खान याला फेब्रुवारी महिन्यात अटक केली. त्यानंतर दोनच महिन्यांत पुन्हा एका स्फोटात शहरातील तरुणांवर तपास यंत्रणांना संशय आला. त्यामुळे शहराचे दहशतवादी संघटनांचे कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.