औरंगाबाद : जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. रात्रीची संचारबंदी १ आॅगस्टपासून मागे घेण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासावर मात्र बंदी कायम आहे.
१ आॅगस्टपासून मनपा क्षेत्र वगळून जिल्ह्यातील इतर भागांतील सर्व दुकाने रोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, फूडकोर्ट, रेस्टॉरंट बंद, तर फूडसची घरपोच सेवा सुरू राहील. रात्रीची संचारबंदी १ आॅगस्टपासून उठविण्यात आली आहे. ५ आॅगस्टपासून मनपा क्षेत्र वगळून मॉल, तसेच व्यापारी संकुलातील दुकाने सुरू होतील; मात्र चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि हॉटेल, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था बंद राहतील.
२ आॅगस्टपासून मद्य व्रिकीची सर्व दुकाने सुरू होतील. बाजारपेठ, दुकाने सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत चालू राहतील. जिल्ह्यात मंगल कार्यालये २३ जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. मोकळ्या मैदानातील व्यायाम निर्बंधांसह चालू राहील. वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवा) चालू राहील. केशकर्तनालय, ब्युटीपार्लर, सलून, स्पा दुकाने २६ जून रोजी जारी केलेल्या निर्बंधांसह चालू राहतील. ५ आॅगस्टपासून खुल्या मैदानात समूहाशिवाय खेळल्या जाणाऱ्या खेळासाठी परवानगी असेल. गोल्फ, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, खुल्या मैदानात खेळले जाणारे बॅडमिंटन व मल्लखांब आदी खेळांना परवानगी राहील.
आंतरजिल्हा प्रवासावर बंदी कायम मनपा हद्दीत लॉकडाऊनबाबत आयुक्तांचे आदेश लागू राहतील. जिल्ह्यात बससेवा जास्तीत जास्त ५० टक्के प्रवाशांसह सुरू राहील. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी असणार आहे. चारचाकी वाहनांसाठी जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी परवानगी आवश्यक.