बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज, शेवता, जळगाव मेटे, निमखेडा व टाकळी जीवरग या गावांपासून जवळच असलेल्या गिरजा नदीपात्रात वाळूचोरीचा रात्रीस खेळ सुरू झालेला आहे. वाळू तस्करांकडून नदीपात्र पोखरण्याचा सपाटा सुरूच असून, यावर कारवाई करण्याऐवजी महसूल व पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
मागील चार वर्षे सातत्याने दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे या नदीपात्राला अक्षरशः वाळवंटाचे रूप आले होते, परंतु गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले, तरी नदी नाल्यांना भरपूर पाणी आले. गिरजा नदीपात्रावरील कोल्हापुरी बंधारे तुडुंब भरले गेले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी त्याचा उपयोग होऊ लागला. ही दिलासा देणारी बाब असताना मात्र, गिरजा नदीपात्रातील पाणी कमी होताच, वाळू तस्करांनी नदी पोखरण्याला सुरुवात केली आहे. रात्री अकरा वाजल्यापासून गिरजा नदीपात्रातून वाळू उपसण्याचा गोरखधंदा वाळू तस्करांकडून केला जात आहे. या भागातून सुमारे पंधरा ते वीस ट्रॅक्टरांमधून ही चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या वाळू तस्करांवर कारवाई का होत नाही, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असूनही महसूल व पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
------
वाळू तस्करांकडून नामी शक्कल
वाळू तस्कर वाळूची चोरी करण्यासाठी विशेष करून विना नंबर प्लेटचा वाहनांचा उपयोग करतात किंवा नंबर प्लेट तोडून टाकतात, तर नदीपात्रातून वाळू नेताना ट्रक्टरचा एकच लाइट सुरू ठेवला जातो. त्यामुळे एका लाइटच्या प्रकाशावर हा वाळूचोरीचा अनोखा कारभार सुरू झाला आहे.
----
नागरिकही त्रस्त
रस्त्यालगत वास्तव्यात असलेल्या नागरिकांना ट्रक्टरच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रास होऊ लागला आहे. या आवाजांमुळे झोपाही उडाल्या आहेत. गिरजा नदीपात्रालगत असलेले शेतकरीही वाळू तस्करांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांची अक्षरशः दादागिरी वाढली आहे.
-------------
शेवता येथील पाणीपुरवठा विहीर लगतच वाळू तस्करांनी पोखरलेली नदीपात्र.