छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात ‘नाईट लाईफ’ सुरू करावे, असा प्रस्ताव महापालिकेने चार महिन्यांपूर्वीच पोलिसांना दिला. त्यावर आता पोलिसांनी नेमक्या कोणत्या आस्थापना सुरू ठेवायच्या, अशी विचारणा मनपाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे महापालिका मुख्यालय ते पोलिस आयुक्तालयाचे अंतर एक किलोमीटरही नाही; पण दोन्ही विभागांचे अधिकारी एकत्र बसून अंतिम निर्णय घ्यायला तयार नाहीत.
शहरात दरवर्षी ३० ते ३५ लाख पर्यटक येतात. अजिंठा, वेरूळ लेणी, मकबरा, पाणचक्की, इ. प्रमुख पर्यटनस्थळे पाहून पर्यटक निघून जातात. शिर्डीला शहरातून कारने जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही हजारोंच्यावर आहे. शहर रात्री ११ नंतर बंद होते. पर्यटक, भाविकांना जेवण मिळत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक शहरात रात्री मुक्काम करीत नाहीत. याचा शहराच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. ‘नाईट लाईफ’ असेल तर पर्यटन वाढेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल, अर्थव्यवस्था सुधारेल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. सध्या मनपा प्रशासन पर्यटनवाढीसाठी विविध मुद्द्यांवर काम करीत आहे.
अनेक वर्षांपासून मागणी‘नाईट लाईफ’ सुरू करण्याची मागणी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटनांसह तज्ज्ञही करीत आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनानेच पुढाकार घेत पोलिसांकडे प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी सादर केला. नाईट लाईफसाठी जालना रोड रात्री दोन वाजेपर्यंत, विविध बाजारपेठाही उशिरापर्यंत सुरू ठेवाव्यात, अशी सूचना करण्यात आली होती.
शहर बंद करण्याची पोलिसांना ड्युटीशहरात सध्या रात्री ११ वाजेपर्यंत विविध दुकाने सुरू असतात. पोलिस कर्मचारी रात्री ११ वाजेपासून हॉटेल्स, दुकाने बंद करण्यासाठी फिरतीवर असतात. हा पोलिसांच्या ड्युटीचा एक भागच बनला आहे. रात्री ११ ते १ वाजेपर्यंत दुकाने बंद करणे, चौका-चौकांत नागरिक थांबू नयेत, यासाठी प्रचंड शक्ती खर्च करावी लागते.
पर्यटकांना लागतील त्या गोष्टी सुरू असाव्यात पर्यटकांना ज्या गोष्टी लागतील त्या सर्व रात्री सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत. हॉटेल, टॅक्सी इत्यादि सोबतच कुठे अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. दिवाळी, ईद आणि आणखी सणांसाठी रात्री १२. ३० वाजेपर्यंत मार्केट सुरू ठेवायला परवानगी डेली पाहिजे. - संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
पोलिसांना यादी कळविण्यात येईलनाईट लाईफसाठी महापालिकेने पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार पोलिसांनी पत्र पाठवून जालना रोडवर नेमक्या कोणत्या आस्थापना आहेत, याची यादी मागितली आहे. त्यानुसार त्यांना यादी कळविण्यात येईल.- सौरभ जोशी, अतिरिक्त आयुक्त महापालिका.