लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाईट चालीरीतींनी प्रवेश केला आहे. पूर्वी लवकर झोपून लवकर उठणे हा पायंडा होता. मात्र, आता नाइट लाइफसारखा प्रकार फोफावला असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र पदभार) श्रीपाद नाईक यांनी सांगितले. हा धोका दूर करण्यासाठी योगाला जवळ करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या योगशास्त्र विभागाचे उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी आणि योगशास्त्र विभाग समन्वयक डॉ. जयंत शेवतेकर मंचावर उपस्थित होते. यावेळी श्रीपाद नाईक म्हणाले की, पूर्वजांनी सांगितलेली जीवन पद्धत आपण विसरलो आहोत. आता शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी आज देशातील बहुतांश भागात कॅन्सर, अल्सरसारख्या विविध आजारांनी विळखा घातला आहे. यासाठी नागरिकांना जडलेल्या वाईट सवयी कारणीभूत आहेत. ऋषी-मुनींनी सांगून ठेवलेला योगाही आपण विसरलो आहोत. या सर्व बाबींचे पुनरुज्जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते जागतिक मंचावर योगाला घेऊन गेले. यामुळे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात येत आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. या नव्याने सुरू होणाºया विभागाला केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेतून ९० लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभारप्रदर्शन समन्वयक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले.
नाइट लाइफमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:09 AM