जालना : मार्चअखेरला आर्थिक वर्ष पूर्ण होते. त्यामुळे वर्षभरातील खात्यांची जुळवणी, खात्यांचा हिशेब वर्ग करणे, कर संदर्भातील कामे तसेच वर्षभरातील आकडेमोडीचे कामे उरकण्यासाठी अनेक बँकांमध्ये रात्रपाळीतही काम सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व पंतसंस्थांमध्ये मार्चएंडच्या कामांची लगबग सुरू आहे. बँक वेळेत ग्राहक सेवा तर रात्री मार्चएंडची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक राष्ट्रीयीकृत बँका तसेच दीडशे खाजगी व निमशासकीय बँका आहेत. सकाळीच साडेआठ ते नऊ वाजता सुरू होणारी कामे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या कामांत अनेक कामांना विलंब झाला. ती कामे मार्चअखेर पूर्ण करावयाची असल्याने बँक कर्मचारी यात व्यस्त आहेत. सरकारच्या आदेशानुसार एक एप्रिलपर्यंत बँका सुरूच राहणार असल्याने बँकांमधील कामांचा ताण वाढला आहे. शासकीय पैशांचे वर्गीकरण, वर्षभराचा ताळेबंद, ताळेबंदातील असलेल्या त्रुटी व तफावत यांचा अभ्यास करून ती दूर करणे, वर्षभरात मोठ्या रकमेची किती उलाढाल झाली त्याचा ताळेबंद एकूणच वर्षभरात बँकांनी जी काही आर्थिक उलाढाल केली आहे. त्याचा ताळेबंद करून आर्थिक वर्षाच्या अखेरीस प्रत्येक बँकांमध्ये कामे केली असल्याचे बँक आॅफ इंडियाचे प्रबंधक लक्ष्मण निनावे यांनी सांगितले. विविध बँकांमध्ये ३१ मार्चपर्यंत या कामांची मोठी धावपळ असते. अधिकारी व कर्मचारी वर्ग मार्च महिन्यात व्यस्त असतात असे निनावे यांनी सांगितले. शहरातील बहुतांश खाजगी बँकांमध्ये आहे. विजया बँकेचे शाखाधिकारी नितीन गुडे म्हणाले, मार्च महिन्यामुळे सकाळी साडेआठ वाजेला बँकेत येत असून, रात्री उशिरा कामकाज संपवतो. बँकेची वेळ झाल्यानंतर मार्चएंडची कामे सुरू आहेत. वर्षभरातील आॅडिटसह इतर कामे सुरू असल्याचे गुडे यांनी सांगतले. (प्रतिनिधी)
मार्चएंडमुळे ‘नाईटशिफ्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 11:06 PM