छत्रपती संभाजीनगर : देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी होत चालला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढत आहे. अशा या उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत गुरुवारी ‘उष्णतेशी लढा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘उष्णतेशी लढा’ या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि. प. सीईओ अंकित, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, अविनाश हवळ, डॉ. अविनाश गरुडकर, आरडीसी विनोद खिरोळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, मीनाक्षी सिंह, डॉ. अनंत फडके आदींची उपस्थिती होती. डॉ. भट्टाचार्य यांनी उष्माघात आणि त्यामुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम, त्यावरील उपचार या विषयी माहिती दिली. जि. प. सीईओ अंकित यांनी वाढत्या तापमान समस्येचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले. हवळ यांनी उष्णतामानाला पूरक वास्तुरचनेची माहिती दिली. प्रास्ताविक मारुती म्हस्के यांनी, तर प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
४२ कोटींतून सौरऊर्जा प्रकल्पपर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि विजेची बचत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेवर वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
पृथ्वीचे तापमान वाढलेदेशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. सध्या पृथ्वीचे एकूणच तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. उष्णता वाढण्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत.- अतुल देऊळगावकर, पर्यावरण तज्ज्ञ