औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार निमित गोयल यांनी मावळत्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडून सोमवारी सकाळी ११ वाजता स्वीकारला. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार डॉ. पवन बनसोड यांनीही स्वीकारला आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची उपस्थित होती.
राज्य शासनाच्या गृह विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णयाद्वारे आयपीएस, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. यामध्ये २००८ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले मुंबई शहर पोलीस दलात उपायुक्त (सशस्त्र दल) निमित गोयल यांची नियुक्ती औरंगाबाद पोलीस अधीक्षकपदी केली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद या ठिकाणी करण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल, गट १३, नागपूर येथील समादेशक डॉ. पवन बनसोडे यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. या बदल्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी बदल्या झालेल्यांना गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत रुजू न होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रविवारी गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर सोमवारीच निमित गोयल आणि पवन बनसोडे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी ग्रामीण पोलीस विभागाकडून नवनियुक्त अधीक्षक निमित गोयल यांना मानवंदना देत स्वागत केले. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांची उपस्थिती होती. तसेच पैठणचे सहायक पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, प्रभारी ठाणेदार, शाखा अधिकारी यांची उपस्थिती होती.
चौकट
दोन तास रंगला स्वागत अन् निरोप सोहळा
नवनियुक्त अधीक्षक गोयल व पाटील यांच्या स्वागत आणि निरोप समारंभाचा सोहळा तब्बल दोन तास रंगला होता. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना प्रशस्तिपत्रही विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर गाेयल, पाटील आणि प्रसन्ना यांनीही मनोगते व्यक्त केली.