संजय तिपाले , बीड‘बाबांनो, चिल्या-पिल्याकडं बघा, माया-माऊलींकडं बघा, दारुच्या नादी कशापायी लागता?’ असा भावनिक सवाल करुन व्यसनात आकंठ बुडालेल्यांची ‘नशा’ उतरविणाऱ्या राहीबाई कचराप्पा धुमाळ (वय ७९) यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील दारुबंदीची चळवळ पोरकी झाली आहे.काळेगाव (हवेली) ता. बीड येथे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी दारुची बाटली आडवी करुन अनेकांचे संसार सावरले होते. त्यानंतर त्यांनी चौसाळा, पिंपळनेर आदी गावांत दारुबंदीसाठी लढा उभारला होता;परंतु यात त्यांना यश मिळाले नव्हते, याची सल त्यांना शेवटपर्यंत जाणवत होती. राहीबाई हे नाव सर्वसामान्य;परंतु दारुबंदीचे नाव जरी निघाले तर त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो, एवढे सगळे योगदान त्यांनी दिले होते. इतर महिलांप्रमाणेच त्या देखील आपल्या संसारात रममाण होत्या. पती, दोन विवाहित मुली, संग्राम, रमेश व रंजीत ही तीन मुले, सुना, नातवंडे अशा गोकुळात त्या वावरत होत्या. अख्खे कुटुंब शेतीत राबणारे, त्यांना स्वत:ला पुरेशी अक्षरओळखही नव्हती; परंतु त्या दारुबंदीच्या लढ्यात रणरागिणी बनून पुढे आल्या त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या एका मुलाला दारुचे व्यसन लागले अन् घरातील शांतता भंग पावली. त्यामुळे राहीबाई व्यथित झाल्या. त्यांनी ठरवले माझ्या मुलासह अख्खे गाव दारुमुक्त करायचे. मात्र, पहिला विरोध झाला तो त्यांच्या घरातून! त्यांनी हिंमत केली, घराबाहेर पडल्या;पण पुढे नियमांचा अडसर आला. कारण गावातील दारुच्या दुकानाला परवाना होता. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय ते पिंपळनेर ठाणे, उत्पादन शुल्क कार्यालय, व जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. कोणाला भेटायचे? अर्ज कसा करायचा? हे त्यांना माहीत नव्हते. तरीही त्या थकल्या नाहीत की हरल्याही नाहीत. कपाळावर ठसठसीत कुंकू, अंगात सुती पातळ, पायात तुटक्या चपला अशा साध्या राहणीमानातील राहीबाई रणरागिणी कधी बनल्या ते कळलेही नाही. कधी तिकिटाला पैसे आहेत तर झेरॉक्सला नाहीत अशा अनंत अडचणींना त्यांनी हिंमतीने तोंड दिले. अखेर प्रशासनाला झुकावे लागले अन् दारुबंदीसाठी मतदान घेण्यास त्यांनी भाग पाडले. घरोघर जाऊन महिलांची विणवणी केली, अन् दारुबंदीच्या लढ्यात विजय मिळविला. तत्कालीन जिल्हाधिकारी भारत सासणे यांनी गावात जाऊन राहीबार्इंचे कौतूक केले होते. हळव्या स्वभावाच्या राहीबाई...दारुबंदीच्या चळवळीशी कायमच्या जोडल्या गेलेल्या राहीबाई धुमाळ यांचे नाव प्रत्येक ठिकाणी आदराने घेतले जाई. दारु कशी घातक आहे हे त्या पोटतिडकीने सांगत. हळव्या स्वभावाच्या राहीबार्इंना अनेकदा अश्रू अनावर होत. उपस्थितांमध्ये दारुविरुद्ध चीड निर्माण करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.शासनदरबारी उपेक्षाच !आयुष्याच्या सायंकाळी दारुबंदीविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या राहीबाई यांच्या पदरी शासनदरबारी मात्र उपेक्षाच पडली. दारुबंदीचा अवघड डोंगर सर करताना पावलोपावली नियमावर बोट ठेवणाऱ्या सरकारीबाबूंनी त्यांची शिफारस शासकीय पुरस्कारासाठी करणे तर दूरच;पण त्यांच्या लढ्याला बळ देण्याची तसदीही घेतली नाही. मनाने तरुण पण वयाने थकलेल्या राहीबाई हातात खुरपे घेऊन शेतात राबायच्या. त्यांना दम्याने गाठले होते. उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
दारुबंदी चळवळीचा आवाज निमाला...!
By admin | Published: March 14, 2016 12:04 AM