वाळूज महानगर : खाद्य पदार्थ व शीतपेयांची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून सिडको वाळूज महानगरातील एका व्यावसायिकाला ९.५० लाखाचा गंडा घालणाऱ्या आरोपीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय सतीश छाजेड (रा. सिडको, वाळूज महानगर) या तरुणाने दीड वर्षापूर्वी मे.आनंद ट्रेडींग कंपनी या नावाने नाष्ट्यासाठी लागणारे खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना काढला आहे. अक्षय यांच्या ओळखीच्या व्यक्तीने खाद्य पदार्थ विक्रीची एजन्सी चालविणाऱ्या दीपककुमार सिन्हा (रा. खारघर जि. रायगड) यांच्याशी ओळख करुन दिली होती. दीपककुमारने एकांश इंटरप्राजयेस (बडोदरा, गुजरात) ही मार्केटिंग कंपनी असल्याचे सांगून छाजेड यांना मुख्य वितरक म्हणून नेमण्यासाठी ई मेलवर करारनामा पाठविला. करारनाम्यानुसार माल साठविण्यासाठी गोदामाचे भाडे, एका व्यक्तीचा पगार व इतर खर्च देण्याचे सांगत टोकन म्हणून ५ लाख रुपये भरायचे होते. २० जुलै रोजी प्रकाश जोशी हे दीपककुमार यांच्या स्वाक्षरीचा करारनामा घेऊन छाजेड यांना भेटण्यासाठी आले. मात्र दीपककुमार प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे नोटरीद्वारे करारनामा आपण करणार नाही असे छाजेड यांनी त्यांना सांगितले.
दीपककुमारने २५ जुलैला मी औरंगाबादला येणार असल्याचे सांगत ५ लाख रुपये भरण्यास सांगितले. छाजेड यांनी ५ लाख रुपये एकांश इंटरप्रायजेसच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे जमा केले. दीपककुमारने करारनामा करण्यासाठी आणखी ७ लाखाचा खर्च येणार असल्याचे सांगितले. छाजेड यांनी वेळोवेळी दीपककुमार यांच्या खात्यावर ९ लाख ५० हजार रुपये जमा केले. ११ ऑगस्टला दीपककुमार बजाजनगरात आल्यानंतर छाजेड यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र पैसे भरुनही दीपककुमार हा करारनामा करीत नव्हता व मालाचा पुरवठा करीत नव्हता. यानंतर दीपककुमारने छाजेड यांना ५ लाखाचे तीन धनादेश दिले. मात्र हे धनादेश वठले नाही. अक्षय छाजेड यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव तपास हे करीत आहेत.
मुंबईतही बेरोजगारांना घातला १ कोटीचा गंडादीपककुमार सिन्हा (४८, रा. वडोदरा, गुजरात) याने रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत अनेक बेरोजगार तरुणांना जवळपास १ कोटी रुपयाचा गंडा घातला. या प्रकरणी खारघर जि.रायगड पोलीस ठाण्यात आरोपी दीपककुमार याच्याविरुध्द महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास खारघर पोलिसांनी अटक केली. अशाच प्रकारे दीपककुमार याने गुजरात व झारखंडमध्येही अनेकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले.