पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने साखर आयुक्तांकडे (पुणे) गाळप परवान्यासाठी सादर केलेला आॅनलाइन अर्ज नामंजूर झाला असून कारखान्याने विनापरवानगी गाळप केल्याचा ठपका ठेऊन प्रतिटन ५०० रुपये प्रमाणे ९ कोटी ४ लाख १० हजार रूपयांचा दंड ‘संत एकनाथ’च्या प्रशासनास ठोठावला आहे. सदरील दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत शासकीय कोषागारात भरणा करण्यात यावी, असे आदेशही कारखान्याला बजावले आहेत. साखर आयुक्तांच्या या दणक्याने संत एकनाथ कारखाना व तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून ऊस उत्पादक शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.२०१७ -२०१८ च्या गळीत हंगामासाठी ‘संत एकनाथ’च्या प्रशासनाने साखर आयुक्त पुणे यांच्याकडे आॅनलाइन अर्ज सादर केला होता. दरम्यान, संत एकनाथ कारखाना १८ वर्षांसाठी आ. संदीपान भुमरे हे चेअरमन असताना मे. सचिन घायाळ शुगर कंपनीस चालविण्यास देण्यात आला होता व या बाबतचा करार शासनमान्यतेने करण्यात आलेला होता. या करारानुसार लवाद म्हणून साखर आयुक्त पुणे यांनी कामकाज पाहावे असे म्हटले आहे.दरम्यान, ‘संत एकनाथ’मध्ये सत्ता बदल झाल्यानंतर भाजपचे तुषार शिसोदे हे चेअरमन झाले. तुषार शिसोदे यांनी ठराव घेऊन सचिन घायाळ शुगर सोबतचा करार रद्द करून कारखान्याच्या गळीत हंगामास परवानगी द्यावी म्हणून आॅनलाइन अर्ज सादर केला होता. याच काळात कारखान्याचा ताबा मिळावा व गाळप परवाना मिळावा यासाठी सचिन घायाळ कंपनीने लवाद ठरविलेल्या साखर आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. या अर्जानुसार साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी ‘संत एकनाथ’चा ताबा सचिन घायाळ यांच्याकडे द्यावा, असे आदेश दिले होते. या आदेशास ‘संत एकनाथ’च्या प्रशासनाने न्यायालयात आव्हान दिलेले आहे.कागदोपत्री ही लढाई सुरू असताना ‘संत एकनाथ’ने तालुक्यातील शेतकºयांचे हित लक्षात घेता ऊस गाळप सुरू ठेवला. उसाचे गाळप करून शेतकºयांचे पेमेंट केले. या हंगामात ‘संत एकनाथ’ ने १८०८२० मे. टन उसाचे गाळप करून शेतकºयांना दिलासा दिला.सहकार मंत्र्यांकडे अपीलसाखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सहकार मंत्र्यांकडे आजच अपील दाखल केले आहे. सचिन घायाळ कंपनीने पूर्वसूचना न देता कारखाना बंद ठेवल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. कारखाना चालू केला नसता तर तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असते, शेतकºयांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला असता हे सर्व डोळ्यासमोर ठेवून गाळप परवान्याचा अर्ज करून शेतकरºयांचा ऊस गाळप केला. राज्य शासन आम्हाला न्याय देईल, अशी प्रतिक्रिया ‘संत एकनाथ’चे चेअरमन तुषार पाटील शिसोदे यांनी व्यक्त केली. साखर आयुक्तांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, अशा प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहेत.
संत एकनाथ कारखान्याला नऊ कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:28 AM