राम शिनगारे
औरंगाबाद : प्रेमात बुडालेल्या तरुणाईला वयाचे भान नसते. अशा काही घटनांत प्रियकरासोबत पळून गेलेल्या ९ अल्पवयीन मुलींची सुटका करण्याची किमया अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएसटीसी) केली आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी स्थापन झालेल्या या कक्षाकडे प्राप्त एकूण १३ प्रकरणांपैकी ९ प्रकरणांचा छडा लावण्यात आला असून, चार प्रकरणे अंतिम टप्प्यात आहेत.
राज्य शासनाने बीड येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘एएसटीसी’ कक्षाची स्थापना केली. त्याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २६ जानेवारी २०२१ रोजी राज्यात २३ ठिकाणी अशा प्रकारचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात हा कक्ष कार्यरत असून, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस असे त्याचे कार्यक्षेत्र आहे. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या घटनेत अपहरणाचा गुन्हा नोंदविला जातो. संबंधित मुलीची सोडवणूक करण्यात संबंधित पोलीस ठाण्यातील तपास पथकाला अपयश आल्यानंतर ते प्रकरण ‘एएसटीसी’ कक्षाकडे साेपविले जाते. या कक्षाकडे सहा महिन्यांत आतापर्यंत १३ प्रकरणे तपासासाठी प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी ग्रामीण पोलीस विभागाकडून ३ आणि उर्वरित प्रकरणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील आहेत. या कक्षाने २०१७ पासून गायब असलेल्या मुलींचा शोध घेतला आहे. त्यातील एका प्रकरणात तर औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने मुलीला न्यायालयात सादर केले होते. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढोले, पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस कर्मचारी संतोष त्रिभुवन, ज्ञानेश्वर तांदळे, ईश्वर कहाटे, हिरा चिंचोळकर, मोहिनी चिंचोळकर यांच्या पथकाने केली आहे.
चौकट.......................
चार वर्षांनंतरही अल्पवयीनच
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पळून गेलेले जोडपे मोबाइल, सोशल मीडियाचा वापर करीत नव्हते. मुलगी पळून गेल्यानंतर चार वर्षांनी सापडली. तेव्हाही ती अल्पवयीनच असल्याचे स्पष्ट झाले. मुलगी चिकलठाण्यातील आणि मुलगा औरंगाबाद तालुक्यातील घोगरगाव येथील होता. या जोडप्याला या कक्षाच्या पथकाने सहा किलोमीटर चालत जाऊन ग्रामीण भागात पकडले. त्यानंतर मुलीला आई-वडिलांकडे सुपूर्द केले.
चौकट.......................
पकडून आणत थेट न्यायालयात हजर
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील मुलगी २०१८ मध्ये औरंगाबादेतील छावणी येथे मामाकडे आली होती. तिचा प्रियकरही पुसद येथीलच हाेता. त्याने या मुलीला छावणीतून पळवून नेले. दोघांचा पत्ता लागत नव्हता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे तेलंगणा राज्यातील भैसा येथे राहत होते. जेव्हा पोलिसांचे पथक तिथे गेले व त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले, तेव्हा प्रियकर पळून गेला. मुलीला ताब्यात घेऊन तिला थेट हायकोर्टात दाखल केले. यानंतर आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
चौकट................
आइस्क्रीमवाल्यासोबत गेली पळून
औरंगाबाद येथील उच्च माध्यमिक शाळेत शिकत असलेली मुलगी आइस्क्रीमची विक्री करणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. एके दिवशी आइस्क्रीम खाण्यासाठी म्हणून ती बाहेर पडली, ती नंतर घरी परतलीच नाही. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. खबऱ्याच्या माध्यमातून ‘एएसटीसी’च्या पथकाने तिचा शोध घेतला तेव्हा तो मुलगा कोपरगावला राहत असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन मुलाचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्याआधारावर हे जोडपे शिर्डी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तेथून या जोडप्याला ताब्यात घेण्यात आले.