आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. याकडे शिक्षण विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. आणखी किती दिवस ही चिमुरडी उघड्यावर ज्ञानार्जनाचे धडे गिरवणार आहेत असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. १५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास शिक्षण विभाग बीड येथे त्यांच्या दालनात शाळा भरवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव खाकाळ यांनी सांगितले.आष्टी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कडा साखर कारखाना, अरणविहरा, कासारी, धनवडे गोठे, लोणी सय्यदमीर, बळेवाडी, आष्टी माध्यमिक जि. प. शाळा, चिंचपूर, गणगेवाडी, तवलवाडी, कारखेल, आष्टी नं. एक या जि. प. शाळांचे पत्रे जूनमधील झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात उडून गेल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली. या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी या शाळांनी अहवाल गटशिक्षण कार्यालयात दाखल करून नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील उघड्या शाळांवर छत पडायला तयार नसल्याने उघड्यावरच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांचे मन रमत नाही. आम्ही अहवाला पलिकडे काहीच करू शकत नसल्याचे शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तालुक्यातील शिक्षण विभागाने ही गंभीर बाब त्वरीत मार्गी लावावी, नसता गटशिक्षण कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे बहुजन विकास मोर्चाचे आष्टी तालुका उपाध्यक्ष प्रा. संजय खंडागळे, अशोक खाकाळ यांनी सांगितले.आष्टीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके म्हणाले, चक्रीवादळातील पत्रे उडालेल्या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी शिक्षणाधिकारी यांना अहवाल पाठवला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
नऊ महिन्यांपासून १२ शाळा उघड्यावर
By admin | Published: February 16, 2015 12:37 AM