लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची वाढती लोकसंख्या तसेच नवीन जलवाहिनी झाल्यावर संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभांचे बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जलवाहिनीच्या कामासोबतच ही कामे सुरू करण्यात आली आहे. शहरात जुने १३ जलकंभ आहेत. पैकी एक मुख्य टाकी व अन्य बारा उपविभागाचे कुंभ आहे. पैकी दोन कुंभ नादुरूस्त आहे. हे जलकुंभ कमी पडत असल्याने पालिकेकडून ९ नवीन जलकुंभ बांधण्यात येत आहेत. नऊ कुंभांपैकी एक मुख्य टाकी व अन्य आठ टाक्या संबंधित विभागाच्या असतील. इंदेवाडी येथे मुख्य पाण्याची टाकी असणार आहे. जलकुंभ उभारण्याबाबतची तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. जागांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.शहरात पाणीपुरवठ्याचे बारा झोन आहेत. त्यासाठी १३ कुंभांतून पाणीपुरवठा सुरू आहे.गत चार ते पाच वर्षांत लोकसंख्या तीन लाखांवर पोहचली आहे. जायकवाडी येथून पाण्याची आवक जास्त असली तरी पाणी साठा करण्यासाठी जलकुंभ कमी पडत होते.आलेल्या पाण्याचा साठा व्हावा म्हणून नऊ जलकुंभ नव्याने बांधण्यात येत आहेत. यापैकी जुन्या बाजार समिती परिसरातील जलकुंभाचा इलेव्हेटेड सर्व्हीस रिझर्व्ह वायर (ईएसआरडब्ल्यू) पूर्ण झाले आहे. नागरी परिसरात उंच टाक्या होणार असल्याने याबाबतचे तांत्रिक निकष पूर्ण करूनच या टाक्या उभारण्यात येणार आहे. विशेषत: नवीन वसाहतींना या जलकुंभाचा फायदा होणार असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.
जालना शहरात होणार नऊ नवीन जलकुंभ
By admin | Published: May 14, 2017 11:44 PM