उस्मानाबाद : शिळी बिर्यानी खाल्ल्याने नऊजणांना विषबाधा झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथे शनिवारी घडली. या सर्वांवर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांचे प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उपळे (मा) येथील जाकीर इब्राहिम पठाण हे मिस्त्री कारागीर असून, त्यांचे कसबे तडवळे येथे काम चालू आहे. या कामावर शनिवारी स्लॅब टाकण्यात आला. दुपारी जेवणाच्या वेळी पठाण यांच्यासह कामावर असलेल्या आकाश पंढरी गोरवे, एवन रामचंद्र जवाहर (राघुचीवाडी), अशोक देवकर, अण्णासाहेब धोत्रे, वसंत जाधव (उपळा), नंदिनी घोडके (उस्मानाबाद), राणी काळे, बबन काळे (सांजा) या सर्वांनी शिळी बिर्यानी खाल्ली. यानंतर काही वेळात त्यांना उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्यामुळे जाकीर पठाण यांनी तातडीने सर्वांना घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचे सांगून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश करंजकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शिळ्या बिर्याणीतून नऊ जणांना विषबाधा
By admin | Published: April 29, 2017 11:35 PM