औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातच मागील पाच महिन्यांमध्ये नऊ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षी एकूण १३ मातांचा मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीतील या आकडेवारीने शासन योजना फक्त कागदावरच सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.महापालिकेत सोमवारी सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी साथरोगांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शहरी भागातील गरोदर मातांची काळजी मनपातर्फे कशा पद्धतीने घेण्यात येते याचा तपशील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला. महापालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रांवर दर महिन्याच्या ९ तारखेला महिलांची मोफत तपासणी करण्यात येते. त्यांना आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येतात. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत ९ मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये हृदयविकार, थायरॉईड आदी आजारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एका महिलेची प्रसूती घरीच झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शहरात असंख्य रुग्णालये, केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू असताना महिलांचा मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली कातडी वाचविण्यासाठी आम्ही माता मृत्यूच्या केसेस तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर ठेवतो. समितीच्या अहवालानुसार आणखी त्यात सुधारणा करण्यात येते. घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी गर्भवती महिलांची नोंद, माहिती ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करतात, असे यावेळी सांगण्यात आले.
पाच महिन्यांत तब्बल नऊ गरोदर मातांचा मृत्यू
By admin | Published: September 20, 2016 12:18 AM