महापालिकेने रेड्डी कंपनीला शहरातील कचरा संकलनाचे काम दिले आहे. दररोज ४०० टन सुका कचरा आणि ३० टन ओला कचरा संकलित केला जात असून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविला जातो. प्रक्रिया केंद्रावर त्याचे विलगीकरण केले जाते. त्यामुळे प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले की, एका केंद्रावर रोज किमान १० टन कचरा गोळा करून त्याचे विलगीकरण करणे व प्रक्रिया करणे, अशी कामे करण्याचे नियोजन आहे. सध्या कांचनवाडी, रामनगर, मध्यवर्ती जकातनाका या तीन ठिकाणी केंद्रे सुरू आहेत. अन्य सहा केंद्रांसाठी जागा निश्चित केली जात आहे. खासगी कंपन्यांच्या मदतीने ही केंद्रे चालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘एक केंद्र – एक कॉर्पोरेट पार्टनर’, असे सूत्र आखून काम केले जाणार आहे. ९ केंद्रांवर प्रत्येकी १० मेट्रिक टन म्हणजे रोज ९० टन कचऱ्याचे विलगीकरण होईल व प्रक्रियादेखील होईल, असा दावा पाण्डेय यांनी केला.