आरटीपीसीआर अनिवार्य : रविवारपर्यंत तपासणी करून अहवाल देण्याच्या मुख्याध्यापकांना सूचना
औरंगाबाद : मनपा हद्दीतील २५३ शाळा व महाविद्यालयातील नववी आणि दहावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. प्रभारी प्रशासक व जिल्हाधिकारी सुनील चौधरी यांच्या सूचनेनुसार मनपाच्या उपायुक्तांनी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांना रविवारपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरु करण्यात आले. त्यावेळी शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात नसल्याने मनपा प्रशासकांनी शाळा सुरु करण्याबाबत ४ जानेवारीला पुनर्विचार करु असे म्हणत विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये असे स्पष्ट केले होते. तर शाळांत ५० टक्के उपस्थितीने ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यावर त्यांनी भर दिला होता. दरम्यान, १५ डिसेंबरला शहरातील ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात पालकांसह विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष वर्ग सुरू कधी होईल याची प्रतीक्षा होती. २४ डिसेंबरला शिक्षणाधिकारी डाॅ. चव्हाण यांनी प्रशासक अस्तिककुमार पांडेय् यांच्याशी चर्चा करून ४ जानेवारीला शाळा सुरू करण्याविषयी पूर्वतयारी सुरू करण्याबाबत चर्चा केली होती. त्याला त्यांनी होकार दिल्याने चव्हाण यांनी शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकांना २५ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ९ वी व १० वीच्या शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन घेण्याची सूचना केली. त्या तपासणीचा अहवाल रविवारपर्यंत मनपा उपायुक्तांनी सादर करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. यासोबत शासनाने शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी डाॅ. चव्हाण यांनी दिल्या आहेत.