औरंगाबाद : हर्सूलच्या हरसिद्धी मातेच्या यात्रेत रेवड्या उधळल्या जातात. साताऱ्यातील खंडोबाच्या यात्रेत भंडारा (हळद) उधळला जातो. मात्र, हनुमान टेकडी परिसरातील सद्गुरू निपटनिरंजन महाराजांच्या यात्रेत चक्क बोरांची उधळण केली जाते. एवढेच नव्हे तर तांदळाच्या खिचडीत बोर टाकून तो प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो.
पहाडसिंगपुरा येथे निपटनिरंजन महाराजांचे मंदिर आहे. मुगल बादशाह औरंगजेबाच्या काळात निपटनिरंजन महाराज औरंगाबादेत वास्तव्याला होते. येथेच त्यांची समाधी आहे. निपटनिरंजन महाराजांची २२ डिसेंबर रोजी पुण्यतिथी असते. तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथे महाराजांना बोरांच्या खिचडीचा प्रसाद चढविला जातो. तोच प्रसाद सर्व भाविकांना वाटला जातो. महाराजांना ‘बोर’ का आवडत असत. बोराचा प्रसाद येथे का दिला जातो, भाविकही येथे बोराचीच का उधळण करतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
यासंदर्भात निपटनिरंजन महाराज समाधी ट्रस्टचे सचिव विनायक पांडे यांनी सांगितले की, बुंदेलखंड येथून निपटनिरंजन महाराज औरंगाबादेत वास्तव्याला आले व ते येथीलच होऊन गेले. सर्वप्रथम ते औरंगपुऱ्यातील नाथमंदिरात वास्तव्य करीत होते. त्यानंतर सध्याच्या पहाडसिंगपुऱ्यात त्यांनी वास्तव्य केले. मुगल बादशाह औरंगजेबाला जेव्हा निपटनिरंजन महाराजांची महती कळली तेव्हा औरंगजेब हत्तीवर बसून महाराजांच्या भेटीला गेला. बादशहाचे गर्वहरण करण्यासाठी निपटनिरंजन महाराज भिंतीवर बसून औरंगजेबासमोर गेले. त्यानंतर अधूनमधून दोघांची भेट होत.
एकदा औरंगजेब आग्रा येथे जाण्यास निघाले त्यांनी महाराजांची भेट घेतली व तुम्हाला आग्रा आग्र्याहून काय आणू असे विचारले. त्यावेळेस महाराज म्हणाले की, तुम्हाला जे आवडेल ते आणा. आग्रामध्ये औरंगजेब एका झाडाखाली बसले होते. ते झाड बोराचे होते. तिथे एक पोपट आला व त्याने असंख्य बोरे खाली खावून टाकली. औरंगजेबाने ती बोरे खाल्ली त्यांना ती गोड लागली. हीच बोरे वेचून जेव्हा ते औरंगाबादेत आले व निपटनिरंजन महाराजांना भेटले व म्हणाले की, तुमच्यासाठी ही बोर आणली आहे. खूप गोड आहे. तेव्हा निपटनिरंजन महाराज म्हणाले की, झाडावर बसलेल्या पोपटाने ती बोर खाली पाडली आहे ना. हे ऐकून औरंगजेब एकदम चकित झाला. तो पोपट म्हणजे महाराज तुम्हीच का, असे म्हणत औरंगजेबाने महाराजांची गळाभेट घेतली.
त्यानंतर निपटनिरंजन महाराजांना जे भाविक भेटण्यासाठी येत तेव्हा बोर घेऊन येत असत. पांडे यांनी सांगितले की, निपटनिरंजन महाराज पहाडसिंगपुऱ्यात राहत त्याठिकाणी पूर्वी गावरान बोरांची शेकडो झाडे होती. आता संपूर्ण परिसरात ६० ते ७० च्या जवळपास झाडे उरली आहेत. महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भाविक बोरांची उधळण करतात व दुसऱ्या दिवशी औरंगपुरा, गुलमंडी येथील भाविक बोरांचा प्रसाद दाखविला जातो.
तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी सद्गुरूनिपटनिरंजन महाराज व सद्गुरूगोगानाथ महाराज यांचा मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे निपटनिरंजन महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, दयाराम बसैये, सुरेश वाजपेयी, संदेश वाघ, संतोष गुजराथी, सुरेश पवार प्रेमराज डोंगरे, फुलचंद सलामपुरे, विजय सांगवीकर, विलास संभाहो यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.