लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे रविवारी (दि.२५) राजाबाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील भव्य मूर्तीने आबालवृद्ध रामभक्तांचे लक्ष वेधून घेतले.रामनवमीनिमित्त सकाळी जिल्हा परिषद मैदान ते किराडपुरा राम मंदिरापर्यंत वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर येथून सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या निमित्ताने श्रीरामचंद्र भगवंत भाविकांच्या भेटीला आल्याची अनुभूती शेकडो भक्तांना आली. शोभायात्रेत डोक्यावर पारंपरिक पांढरी टोपी परिधान करून आणि हातात भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले. सजविलेल्या रथात श्रीरामाची मूर्ती विराजमान होती, तर उघड्या वाहनात श्रीरामाची १0 फूट उंचीची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. ही मूर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. अनेक रामभक्त मोबाईलमध्ये ती छबी टिपत होते, तर अनेक जण मूर्तीच्या बाजूला लहान मुलांना उभे करून फोटो काढत होते. या मूर्तीसमोर युवकही आवर्जून सेल्फी काढताना दिसून आले.यावेळी संस्थान गणपती आणि श्रीरामाच्या मूर्तीची आरती करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप जैस्वाल, पृथ्वीराज पवार, अनिल मकरिये, नगरसेवक सचिन खैरे, समीर राजूरकर, लच्छू पहिलवान, ऋषिकेश जैस्वाल, चिराग गादिया, तेजस पहाडिया, अजय खुदभेये, दीपक परदेशी, सौरभ गादिया, प्रतीक धोका, ओंकार क्षीरसागर, किरण खुदभेये, रोशन पिपाडा, सिद्धांत शर्मा आदींची उपस्थिती होती. शोभायात्रेत तरुणाईची मोठी संख्या पाहावयास मिळाली. यावेळी बँड पथकाने विविध गीते वाजवून शोभायात्रेत चांगलीच रंगत आणली. बँड पथकाची गीते व तालावर युवकांनी नृत्य करीत चांगलाच ठेका धरला. शोभायात्रा मार्गात ठिकठिकाणी भाविक मूर्तीचे दर्शन घेत होते. जसजशी शोभायात्रा पुढे सरकत होती, तसा जल्लोष वाढत होता. विविध रंगांच्या प्रकाशयोजनेने शोभायात्रेचा मार्ग उजळून गेला.शोभायात्रेचा मार्ग दुमदुमलारामभक्तांच्या मुखातून निघणारा ‘सियावर रामचंद्र की जय’ यासह विविध जयघोषांनी शोभायात्रेचा मार्ग दुमदुमून जात होता. शहागंज, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे कुंभारवाडा येथे शोभायात्रेचा समारोप झाला.
औरंगाबादेत ‘जय श्रीराम’चा निनादला घोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:01 AM
‘सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे रविवारी (दि.२५) राजाबाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील भव्य मूर्तीने आबालवृद्ध रामभक्तांचे लक्ष वेधून घेतले.
ठळक मुद्देशोभायात्रा : भव्य मूर्तीने वेधले रामभक्तांचे लक्ष, बँड पथकाच्या तालावर धरला युवकांनी ठेका