औरंगाबाद – प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे (वय ६२) यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारुडाच्या माध्यमातून आयुष्यभर अवयवदान चळवळीची जनजागृती त्यांनी केली. मात्र, दुर्दैवाने कोरोनामुळे त्यांचे निधन झाले अन् त्याचे स्वत:चे अवयव दानाचे स्वप्न स्वप्नच राहिले.
रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. वडील जुने नाटकर्मी होते. अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्यामुळे घरातून कलेचा वारसा मिळाला. लहानपणी त्यांनीसुद्धा ग्रामीण भागातील नाटकात छोट्या भूमिका केल्या. कलापथकात हार्मोनिअम वाजविण्याचे काम करायचे. कार्यक्रमानिमित्त ठाणे येथे होते. वर्तमानपत्रात अशोक परांजपे यांच्याविषयी वाचून भारावले. त्यांची भेट घेतली अन आयुष्य बदलले. त्यांनीच लोककलेचा मार्ग दाखविला आणि भारुडाने त्यांना गारुड घातले ते आयुष्यभराठीच.
भारुड लोककलेला त्यांनी सर्वस्व जीवन अर्पण केले होतं. भारुडातून समाजप्रबोधनाचा वसा घेतला. भारुड हेच माझ्या रोजगाराचे साधन आहे. माझ्या कामात माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे. पत्नीचा माझ्यावर अन माझा पत्नीवर विश्वास आहे. प्रत्येक संकटात ती माझ्या सोबत असते. संघर्षात तिने मला खंबीर साथ दिली आहे. मुलगा शेखर सावलीसारखा माझ्यासोबत उभा असतो. तो अत्यंत आज्ञाधारक आणि मेहनती आहे, असं ते म्हणायचे.
भारुड आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये माझे कार्यक्रम झाले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझी नोंद झाली. मात्र भारुडाचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती हालाखिची होती. संकटांशी संघर्ष करीत लोककलेची उपासना केली त्याला आज यशाची फळे लागली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
कलाकार तरुणपणी घराबाहेर अन म्हातारपणी घरात असतो. तारुण्यात पैसा, ग्लॅमर, प्रसिद्धी, नाव याच्या मागे बेधुंद धावत असतो. मात्र त्याचवेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जीवन हे अमूल्य आहे. कधी काय होईल, सांगता येत नाही. त्यामुळे आपले आरोग्य जपा. माणूस सर्व सोंगे घेऊ शकतो. परंतू पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळे कमावलेला पैसा बचत करुन ठेवा. चंगळवादाच्या नादात पैसा खर्च करु नका. म्हातारपणी तुमचाच पैसा तुमच्या कामी येईल. आज अनेक कलाकार पैसा नसल्यामुळे वैद्यकिय खर्च करु शकत नाही. आपल्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी नवोदितांनी आतापासून याची काळजी घ्यावी. माझे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे परिस्थितीमुळे शिकता आले नाही. कुटूंबियांचे व माझे पोट भरण्यासाठी रोजगार शोधणे आवश्यक होते. खासगी कंपनीत कामे केली. मात्र जम बसला नाही. कुठेच मन रमले नाही. लोककलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आज भारुड हाच माझा श्वास आहे, असं ते म्हणायचे. आज कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला.