लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नवीन पोलीस वसाहतीमधील कम्युनीटी हॉलमध्ये १५ जुलै रोजी निर्भया पोलीस मित्र शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिला पोलिस मित्र यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, सुनीता मुळे, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात, पोनि गणपत दराडे, पोनि मैराळ, पोनि मधुकर कारेगावर, सपोनि राठोड तसेच पोलीस दलातील विविध शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबीरात ४०० महिला व २५० पुरूष सहभागी झाले होते. महिला पोलिस मित्रांनी घटनेची माहिती जवळील पोलीस ठाण्यात कळवावे, माहिती मिळताच संबधित प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना चावरिया यांनी दिल्या. कार्यवाही न झाल्यास सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावी. तिथेही दखल न घेतल्यास थेट संपर्क साधावा असे ते म्हणाले. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास कुठलेच भय न बाळगता निर्भयपणे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाय महिला पोलिस मित्रांना ओळखपत्रही दिले जातील असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक चावरिया यांच्या हस्ते दामिनी व लहान मुलांचे प्रश्न यावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
निर्भया महिला पोलीस मित्र बजावणार कर्तव्य
By admin | Published: July 15, 2017 11:47 PM