- योगेश पायघन
औरंगाबाद - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शैक्षणिक संस्था व विद्यापीठाच्या देश पातळीवर क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला याही वर्षी स्थान मिळाले. देशभरातील विद्यापीठांच्या रॅंकिंगमध्ये ४२.५९ स्कोअर करून ८३ वा रॅंक विद्यापीठाला मिळाला आहे. मात्र, पेटंट आणि ऑनलाईन कार्यक्रमात स्कोअर कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रॅंक घटला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत २०२२ चे रॅंकिंग शुक्रवारी जाहीर केले. राज्यातील पहिल्या शंभर मध्ये १३ विद्यापीठांचा समावेश असून १३ व्या स्थानी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. विद्यापीठाने रॅंकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध प्रवेश न होणारे अभ्यासक्रम बंद केले. त्याशिवाय ऑनलाईन परीक्षा, सीएसआर मधून कोरोना तपासणी लॅब,स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण केंद्राची सुरूवात, पेटंट, संशोधन, पेट आदी उपक्रम राबवले.
कमी पडलेल्या बाजू सक्षम करूपहिल्या शंभरमध्ये विद्यापीठाला स्थान मिळाल्याचा आनंद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रॅंकिंग घटली त्याचे विश्लेषण करून कमी पडलो. त्या बाजू मजबूत करून गुणवत्ता वाढवण्यावर भर देवू. मुल्यांकनात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले गुण मिळाले. केवळ पेटंट आणि ऑनलाईन प्रोग्राममध्ये स्कोअर घटला आहे. त्यात पुढील वर्षाच्या सुधारणाची तयारी यापुर्वीच सुरू केली आहे. त्यात पुढील वर्षी नक्कीच सुधारणा दिसेल.- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद