औरंगाबाद : जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे आता काम व्यवस्थित सुरू आहे. आगामी सहा ते सात महिन्यांत जळगाव-औरंगाबाद चारपदरी रस्ता पूर्ण होईल. तसेच मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांतही लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
एमजीएमच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी ऑनलाइन उपस्थित असलेले केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचा परिचय करून देताना औरंगाबाद-अजिंठा लेणी रस्त्याकडे लक्ष देऊन तो लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘या रस्त्याचे काम कंत्राटदारामुळे रेंगाळले आहे. त्यात भूसंपादन वेळेवर झाले नाही. बागडेंमुळे दोन लेनचा रस्ता चार लेनचा केला. वाढीव किमतीला मान्यता मिळण्यास उशीर झाला. त्यातच कंत्राटदार पळाला. दुसरे कंत्राटदार आणले आहेत. आता काम व्यवस्थित सुरू आहे. येत्या सहा ते सात महिन्यांत जळगाव-औरंगाबाद चारपदरी रस्ता पूर्ण होईल.'
तसेच मराठवाड्यात बरीच कामे अडकली होती. ती मार्गी लागत आहेत. शिर्डीला जास्त विमाने यायला लागली. औरंगाबादला विमाने येत नाहीत, ही तुमची व्यथा मी समजू शकतो. लवकरच हा रस्ता, पर्यटन चांगले होईल. नागपूर-रत्नागिरी चारपदरी सिंमेट रस्ता, १२ हजार कोटींतून ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. पैठण ते पंढरपूर रस्त्याचेही काम मार्गी लावू. मराठवाड्याच्या विकासात नक्कीच लक्ष देईल.’ अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.