औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा गुरुवारी पत्रपरिषदेत आ. हरिभाऊ बागडे यांनी केला. तर आम्ही शेतकरी कुटुंबांतूनच आलो, आम्ही कसले प्रस्थापित, असा टोला अब्दुल सत्तार यांनी प्रतिस्पर्धी पॅनलच्या नेत्यांना लगावला.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. चर्चेसाठी आमच्याकडे कुणी आलेच नाही, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील हेच चेअरमनपदाचे उमेदवार राहतील, असे जाहीर केले. त्याला हरिभाऊ बागडे यांच्यासह सर्वांनीच पाठिंबा दिला. बुधवारी नितीन पाटील यांनी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. गुरुवारी शेतकी मतदार संघातील उमेदवारांची जाहीर करण्यात आलेली नावे अशी : औरंगाबाद तालुका: जावेद पटेल, खुलताबाद - सुनीता विलास चव्हाण, फुलंब्री -सुहास शिरसाट, सिल्लोड - अर्जुन गाढे, सोयगाव -सुरेखा प्रभाकर काळे, कन्नड-मनोज राठोड,पैठण - संदिपान भुमरे.
निवडणूक बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु शंभर टक्के नाही तर बऱ्यापैकी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. सहकारात पक्ष नसतो. संस्था टिकवायची असते, असे सांगत हरिभाऊ बागडे यांनी सहकाराला बाधा येणार नाही, असे आम्ही वागणार असल्याची ग्वाही दिली. पत्रकार परिषदेस आ.अंबादास दानवे, अण्णासाहेब माने, दामुअण्णा नवपुते, अंकुश रंधे, अभिजीत देशमुख आदींची उपस्थिती होती.
हे शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर...मंत्री व आमदार खासदारांचे कार्यक्षेत्र मोठे असते त्यांनी बँकेत घुसू नये याकडे लक्ष वेधले असता, अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, ही शेतकऱ्यांची बँक आहे. हे शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर आहे. येथे लोकप्रतिनिधींनी काम करू नये असे म्हणणे चूक आहे. यापूर्वीही आम्ही सर्वांनी या बँकेत काम केले आहे. यावेळी आमचे पॅनल निवडून येणार आहे.