औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा बँक अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या या शिवसेनेतील प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाचा पाटील यांचा मार्ग सुकर झाला असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नितीन पाटील यांचा शिवबंधन घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर यांची उपस्थिती होती.
५ एप्रिल रोजी बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आ. हरिभाऊ बागडे, मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार नितीन पाटील हेच राहतील, असे घोषित केले होते. त्यामुळे ते अध्यक्ष बनण्याबद्दल साशंकता नव्हती; परंतु नितीन पाटील हे भाजपमध्ये असणे हा अडथळा होता. शिवसेनेत प्रवेश करून हा अडथळाही आता नितीन पाटील यांनी दूर केला आहे. अध्यक्षपदावर शिवसेना दावा करणार हेही यानिमित्ताने खरे ठरत आहे. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असा रंग येतो का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मग अशावेळी चुरस निर्माण होऊन फोडाफोडी होते का, हेही पहावे लागेल. शिवाय शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे पाच संचालक आणि अपक्ष अभिषेक जैस्वाल यांची भूमिका काय राहू शकेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मूळचे काँग्रेसचेच असलेले नितीन पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतरही अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक मानले जात होते.