औरंगाबाद : शहरात निजामगंज नावाने एक पोस्टऑफिस सुरू आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. व अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले असेल, हे पोस्ट ऑफिस कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल.
जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या मुख्य इमारती समोरील सेल हॉलच्या पहिल्या मजल्यावर आहे. तिथे 'निजामगंज उप डाकघर' अशी पाटी लावण्यात आली आहे. एका रूममध्ये हे पोस्ट ऑफिस चालते. निजामशाही संपून ७३ वर्षे होत आहेत. पण अजूनही हे पोस्टऑफिस त्यावेळच्या नावाने येथे सुरू आहे.
स्वातंत्र्यापूर्वी मोंढा शहागंज परिसरात भरत असत. त्यावेळी निजामगंज पोस्टऑफिस त्याच परिसरात कार्यरत होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र झाला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झाला. त्यानंतर शहागंजमध्ये भरणाऱ्या मोंढ्याचे स्थलांतर सध्याच्या जुन्या मोंढ्यात झाले. तेव्हा बाजार समितीचे पदाधिकारी राधाकिसन राणा व आसाराम बलदवा यांच्या प्रयत्नामुळे शहागंज येथील निजामगंज पोस्टऑफिस १९५५ मध्ये जुन्या मोंढ्यात स्थलांतरित झाले. जागा कमी पडत असल्याने नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने जाधववाडीत बाजार संकुल उभारले. १९९८-१९९९ यावर्षी जुन्या मोंढ्यातील आडत व्यवहार जाधववाडीत स्थलांतरित झाला. पोस्टऑफिसची आवश्यकता लक्षात घेता. तत्कालीन कृऊ बाजार समितीचे सभापती शब्बीर पटेल व व्यापारी संचालक सतीश सिकची यांनी भारतीय पोस्ट कार्यालयात पाठपुरवठा करून निजामगंज पोस्टऑफिसचे स्थलांतर २००२ मध्ये जाधववाडीत केले. त्यावेळीस नाममात्र भाडेतत्वावर बाजार समितीने पोस्टऑफिसला गाळे दिले अजूनही तिथेच निजामगंज उप डाकघर सुरू आहे. विशेष म्हणजे उप डाकघर असल्याने येथून पत्र वितरणाचे कार्य होत नाही. जाधववाडीत येणारे टपाल पाहिले चिकलठाणा पोस्टऑफिसमध्ये येते तिथून नारेगाव पोस्टऑफिसमध्ये जाते व तिथून जाधववाडीत टपाल येऊन मिळते.
चौकट
मोंढ्याला म्हणतात निजामगंज
निजामशाहीमध्ये जिथे मोंढा असेल त्या भागाला निजामगंज म्हटले जात असे. त्यामुळे जुन्या मोंढ्याला पूर्वी निजामगंज म्हटले जात होते. १९६९ नंतर निजामगंज ऐवजी मोंढा असे म्हटले जाऊ लागले.
आजही धर्माबाद येथील मोंढ्याला निजामगंज असेच म्हणतात.
सतीश सिकची
ज्येष्ठ व्यापारी