औरंगाबाद : मंगळवारी (दि. ७) शहरात दीड तास ढगफुटीसारखा पाऊस झाला. शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. अग्निशमन विभागाला घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यासाठी ४८ तास लागले होते. डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत महापालिका प्रशासनाने यापूर्वीच दिल्ली येथील कंपनीला १५ मोठे आणि १५ लहान पंप खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. या पंपखरेदीवर जवळपास ९० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
शहरात कोणत्याही वसाहतीत पावसाचे पाणी साचले, तर पहिला कॉल अग्निशमन विभागाला येतो. अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानंतर अग्निशमन विभागाची प्रचंड दमछाक होते. मुळात घरांमध्ये शिरलेले पावसाचे पाणी काढण्याचे काम अग्निशमन विभागाचे नाही. रस्त्यावर झाड कोसळले असेल तेथे, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, वाहून जाणाऱ्यांना वाचविणे, आदी कामे त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. महापालिकेची वॉर्ड कार्यालये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सक्रिय नसल्यामुळे दिवसेंदिवस अग्निशमन विभागावरील ताण वाढतो. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अग्निशमन विभागाच्या कामाचा सखोल अभ्यास करून वॉर्ड कार्यालयांवर डिझास्टर मॅनेजमेंटची काही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. तातडीने पाण्याचा उपसा करणारे मोठे १५ आणि लहान १५ पंप खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा काढण्यात आली. दिल्ली येथील राहुल इंजिनिअरिंग ही कंपनी निविदा प्रक्रियेत पात्र ठरली. कंपनीला वर्क ऑर्डरही दिली.
मात्र, मागील दोन महिन्यांपासून कंपनी पंपांचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. कंपनीने साहित्य पुरवठा करण्यासाठी १५० दिवसांचा अवधी वाढवून मागितला. महापालिकेने ६० दिवसांमध्येच साहित्य पुरवठा करावा लागेल, अशी अट घातली आहे.
काम अधिक लवकर होईल
महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयात एक मोठा आणि एक छोटा पंप ठेवण्यात येणार आहे. नऊ वॉर्ड कार्यालयांना हे पंप देण्याची योजना आहे. आपल्या परिसरात कुठेही पावसाचे पाणी साचले, तर वॉर्ड कार्यालयांनीच ते पाणी काढावे, असा दंडक घालण्यात येणार आहे. अग्निशमन विभागाकडे १२ पंप राहतील.
साहित्य मिळविण्याचे प्रयत्न
महापालिकेकडे जुने १० पंप आहेत. त्यांची कार्यशक्ती संपली आहे. वारंवार ते बंद पडतात. अलीकडेच ४ पंप दुरुस्त करून आणण्यात आले. नवीन मोठे पंप आहेत. त्यांमध्ये पाणी ओढण्याची क्षमता चारपट आहे. हे साहित्य लवकरात लवकर मिळविण्यासाठी यांत्रिकी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
- अमोल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी विभाग, महापालिका.