औरंगाबाद : १ जानेवारी २०१५ पासून रेडीरेकनर रेटस्मध्ये(शीघ्र गणक दर) वाढ झाली असून, त्याचा फटका मनपा हद्दीत बांधकाम परवानगी महागण्यावर झाला आहे. परवानगी महागल्याचा परिणाम घरांच्या किमतींवरही होणार आहे. मनपाकडे शेकडो बांधकाम संचिका तुंबल्या असून, काही संचिकांना ३१ डिसेंबर २०१४ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारपासून नवीन दर लागू झाले आहेत. दर जाहीर होण्यापूर्वी संचिकांना विकास शुल्कासाठी जुने दर लागावेत, यासाठी ३१ डिसेंबर रोजी नगररचना विभागात संचिका मंजुरीसाठी अनेकांची लगबग होती. दरवर्षी १ जानेवारीपासून आरआर रेटस्मध्ये वाढ होते. गेल्या वर्षी १० टक्के वाढ झाली होती. यावर्षी ११ टक्के वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शहर विकास शुल्क वाढीवर झाला आहे. नगररचना विभागातील सूत्रांनी सांगितले की, आरआर रेटस्मध्ये वाढ झाली आहे.बांधकाम परवानगी महागण्यावर त्याचा परिणाम होणार आहे. अजून नवीन दरवाढीचे पत्र मनपाला मिळालेले नाही. वाढलेल्या आरआर रेटस्मुळे टीडीआरला फटका बसण्याची भीती नगररचना विभागाने व्यक्त केली आहे. ८ वर्षांमध्ये सहा झोनमध्ये टीडीआरला पाहिजे तसा वाव मिळाला नाही. नवीन दरानुसार बांधकाम परवानगी देण्याचा ऐनवेळीचा ठराव मनपाने ४ वर्षांपूर्वीच मंजूर करून घेतला आहे़ त्या ठरावामुळे शहरात घर बांधणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत़
मनपाची बांधकाम परवानगी महागली
By admin | Published: January 02, 2015 12:28 AM