औरंगाबाद : सातारा-देवळाईतील कर्मचाऱ्यांचे पगार ६ महिन्यांपासून रखडले असून, कर्मचारी महानगरपालिका आस्थापना विभागात फेऱ्या मारून वैतागले आहेत. कामगार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सातारा-देवळाई दोन्ही ग्रामपंचायती मनपात समाविष्ट झाल्या असून, तेथील सफाई मजूर, पाणीपुरवठा, स्मशानभूमी रक्षक, वसुली विभाग अशा सर्वच विभागांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नुकतेच मनपाच्या वेतनावर घेतले आहे; परंतु त्यातील ८ कर्मचाऱ्यांची अद्यापही वेतनाची प्रक्रिया रखडलेली असून, नोव्हेंबर २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत वेतन खात्यात जमा झालेले नाही.
या कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम करून महापौर, इतर पदाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. आस्थापना विभागातील लिपिकांकडे फायली अडकून पडल्या असल्याने दररोज नवीन थापा मारून या कर्मचाऱ्यांची ६ महिन्यांपासून पगाराची प्रतीक्षा सुरू आहे.सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या असून, नवीन सत्रात शाळा सुरू होण्यापूर्वी वेतन मिळाले नाही, तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या आठही कर्मचाऱ्यांना दुकानदार व भाजीपाला व्यावसायिकांनी देखील उधार वस्तू देणे टाळले असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाहीमहानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी आर्थिक घुसमट सहन करावी लागत आहे. अधिकारी व वरिष्ठांकडे सतत फेऱ्या मारूनही वेतन बँकेत का जात नाही. अजून कर्मचाऱ्यांना किती दिवस त्रास सहन करावा लागणार, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.