लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा केअरचे वैद्यकीय अधिकारी मागील नऊ महिन्यांपासून विनापरवानगी गैरहजर असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालकांकडे पाठवूनही याबाबत आजपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.जिंंतूर तालुक्यातील नागरिकांना अद्यावत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण रुग्णालयासह ट्रामाकेअर युनिट शासनाने सुरू केले. परंतु, ग्रामीण रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी व ट्रामाकेअर युनिटमध्ये एक असे दोनच वैद्यकीय अधिकारी सध्या रुग्णालयाचा कारभार चालवित आहेत. ट्रामाकेअर युनिटमध्ये मंजूर ५ पदांपैकी अस्थिरोग तज्ज्ञ १५ मार्च २०१६ पासून ट्रामा केअर युनिटमध्ये आले नाहीत. त्यामुळे तीन पदे रिक्त असून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहे. तर ग्रामीण रुग्णालयातील तीन पैकी दोन डॉक्टर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. तर एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यात आली असतानाही मागील कित्येक महिन्यांपासून त्या कामावर रुजू झाल्या नाहीत. दोन्ही रूग्णालयातील एकूण तीन वैद्यकीय अधिकारी मागील नऊ महिन्यांपासून तर एक अधिकारी दोन महिन्यांपासून रूग्णालयाकडे फिरकला नाही़ रूग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने आरोग्य विभागाने दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पी शिवाशंकर व औरंगाबाद आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून या अहवालावर कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही या दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्यांना अभय मिळत आहे का? असा प्रश्न या परिसरातील रूग्णांमधून उपस्थित केला जात आहे़
गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होईना
By admin | Published: July 14, 2017 12:14 AM