नागद : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी हे गेल्या आठवडाभरापासून केवळ मदत देण्याच्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. परंतु, प्रत्यक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व ग्रामस्थांना अद्यापही मदत झाली नाही. आम्हाला आश्वासन नको, मदत करा, अशी आर्त हाक नागद शिवारातील नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे.
----
त्या बालकाच्या मृत्यूला जबाबदार कोण
गडदगड नदीला पूर आल्याने हरसवाडी गावालगत असलेला पूल वाहून गेला. याच दरम्यान येथील रोहन चव्हाण या तीन वर्षीय मुलाची तब्येत खालावल्याने त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दुदैर्वी घटनेला नेमके जबाबदार कोणाला ठरवायचे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----
कधी, किती अन् कशी मिळणार मदत ?
भीलदरी धरण फुटल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे, दुकान वाहून गेलेल्या व्यापाऱ्यांचे त्वरित पंचनामे केले जातील, असे आश्वासन दिले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ते कधी होणार, अहवाल गेल्यानंतर नेमकी कधी, किती व कशी मदत मिळणार असा पूरग्रस्त गावातील नागरिकांकडून केला जात आहे. त्वरित मदत केली जावी, अशी मागणी नागदचे सरपंच राजधर अहिरे, ग्रा.पं. सदस्य रणजित ठाकरे, नाना अहिरे, नामदेव गोठवळ, सुभाष महाजन, वडगाव उपसरपंच प्रदीप पाटील, सायगव्हाणचे रमेश पाटील यांनी केली.