२० टक्के महिला थेट प्रसूतीसाठी रुग्णालयात
कोरोना काळाचाही परिणाम : ‘दोन डोके, पण शरीर एकच’, २ टक्के बालकांत आढळतात व्यंग
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दोन डोके, पण शरीर एकच, अशा बाळाचा जन्म. ही एखाद दुसरी घटना नसून, घाटी रुग्णालयात वर्षभरात एकूण प्रसूतीत २ टक्के बालके व्यंग असलेली जन्मली. पण ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान देणारी ठरत आहे. आजही, विशेषत: ग्रामीण भागांत महिलांची गरोदरपणात नियमित तपासणी होत नसल्याची स्थिती आहे. कोरोना काळात तर त्यात आणखी भर पडली. २० टक्के महिला प्रसूतीपूर्व तपासणीपासून वंचित राहत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गर्भधारणेपासून जन्मापर्यंत काही शारीरिक व्याधी व आजाराची शक्यता असल्यास त्याची माहिती सध्याच्या आधुनिक युगात नियमित होणाऱ्या तपासण्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात मिळते. प्रत्येक गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूती पश्चात आरोग्य सुविधा, प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध आहे. परंतु तरीही अनेक गरोदर महिला ९ महिन्यांत एकदाही रक्त तपासणी, सोनोग्राफी करत नाही, थेट प्रसूतीसाठी दाखल होत असल्याची स्थिती आहे. अशावेळी अनेकदा प्रसूतीदरम्यान, गर्भात गुंतागुंत अवस्था समोर येते. त्यातून अनेकदा मातेसह शिशूच्या जीवाला धोका निर्माण होतो. तर व्यंगासह आयुष्य काढण्याची वेळ शिशूवर येते. परिणामी, गरोदरपणातील गुंतागुंत आणि गर्भातील शिशूत असलेले व्यंग वेळीच समोर येत नसल्याची बाब चिंतादायक ठरत आहे.
--
एका महिन्यात १३ बालकांत व्यंग
घाटीत काही दिवसांपूर्वीच दोन डोके असलेले शिशू जन्मले. वैद्यकीय परिभाषेत याला ‘कोजाईन्ड ट्विन म्हटले जाते. २० आठवड्यावरील गर्भ होता. ही बाब निदर्शनास येताच न्यायालयात दाद मागून हे बाळ काढून टाकण्याची परवानगी घेण्यात आली. घाटीत मे महिन्यात ९१९ प्रसूती झाल्या. यात १३ बालकांत जन्मजात व्यंग असल्याचे समोर आले. डोक्यात पाणी, पाठीला गाठ असे अनेक व्यंग आढळतात.
---
काही प्रमाणात परिणाम
कोरोना प्रादुर्भावामुळे प्रसूतीपूर्व तपासण्यांवर काही प्रमाणात परिणाम झाला. घराबाहेर पडू नका असे सांगितले जात होते. त्यामुळे सोनोग्राफीसाठी जाण्याचे टाळण्यात आले. काहींनी रक्त तपासण्या केल्या नाही. गरोदरपणाच्या ९ महिन्यांत चार ते पाच वेळ सोनोग्राफी केल्या जातात. यात १९ आठवड्यातील सोनोग्राफी महत्त्वाची ठरते. कारण त्यातूनच गर्भातील व्यंगदोष दिसून येतात. गरोदर महिलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी नियमित तपासणीवर भर दिला पाहिजे.
-डॉ. अनुराधा शेवाळे, अध्यक्ष, स्त्रीरोग संघटना (एफ.ओ. जी.एस.आय.)
----
जनजागृती व्हावी
शासनाच्या जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी तपासणी मोफत केली जाते. त्याविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे २० टक्के महिला प्रसूतीपूर्व तपासणीपासून वंचित राहत आहे. वर्षभरात १८ हजार प्रसूती होतात. एकूण प्रसूतीत गर्भातील शिशूत व्यंग असण्याचे प्रमाण २ टक्के आहे. २० आठवड्याच्या आत व्यंग समोर आले तर अशा बाळांचा जन्म थांबविता येऊ शकतो. जननी शिशू सुरक्षा योजनेविषयी अधिक जनजागृती झाली पाहिजे.
-डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी