उस्मानाबाद : जिल्हाभरात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अपंगांसाठी जवळपास २५ शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांतून मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाने या शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचे निर्देश दिले होते. परंतु, शाळा चालकांनी ही बाब फारशी गांभिर्याने न घेता त्याकडे कानाडोळा केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. २५ पैैकी २२ शाळांनी अद्यापही ‘सीसीटीव्ही’ बसविले नसल्याने त्यांना समाजकल्याण विभागाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विशेष गरजा असलेल्या म्हणजेच अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शाळा चालविल्या जातात. या शाळांमधून विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरविल्या जातात की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. ही तपासणी महिला अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्याबाबत आदेश होते. त्यानुसार समाजकल्याण विभागाकडून महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून शाळांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेने सीसीटीव्ही’ बसवावेत, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. परंतु, सदरील आदेश येवून काही महिन्यांचा कालावधी लोटूनही शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसलेले नाहीत. अशा २५ पैैकी बावीस शाळा आहेत. या सर्व शाळांना समाजकल्याण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. सदरील नोटिसेचा खुलासा आल्यानंतर शाळांविरूद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे किती शाळांविरूद्ध कारवाई होते? हे पाहणे औैत्सुक्याचे ठरणार आहे.(प्रतिनिधी)
अपंगांच्या शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’चा नाही पत्ता!
By admin | Published: March 19, 2017 11:34 PM