औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad ) वतीने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतली जाणारी पदवी परीक्षा उद्या मंगळवार दि. ८ फेब्रुवारीपासून ऑनलाइन (online Exam) सुरू होत आहे. मात्र, ही परीक्षा बी.ए., बी.एससी., बी.कॉम.च्या द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या सेमिस्टरची होणार आहे. नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारीपासून होणार आहे.
तथापि, काही विषयांत नापास झालेले, परीक्षा न दिलेले, अथवा परीक्षेपासून वंचित राहिलेले तब्बल सव्वालाख विद्यार्थी आजपासून ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा झाल्या आहेत. तरीही नापास अथवा विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखाहून अधिक कशी, यावर विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, जेव्हा ऑफलाइन परीक्षा घेतली जाते. तेव्हा ४० विद्यार्थी नापास होतात. यात काही विद्यार्थी परीक्षा देत नाहीत, तर काही विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये नावापुरतेच प्रवेश घेतलेेले असतात. काही वैयक्तिक अडचणींमुळे विद्यार्थी परीक्षा अर्जच भरू शकत नाहीत. ऑनलाइन परीक्षेत अशा विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत असते.
परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असला, तरी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एकच तास कालावधी असणार आहे. अनेकदा नेटवर्कची समस्या येणे, लॉगीन न होणे, लॉगीन झाल्यावरही पेपर अपलोड न होणे आदी समस्या येत असल्यास, विद्यार्थ्यांना या तीन तासांच्या कालावधीत कोणत्याही एका तासात परीक्षा द्यावी लागणार आहे.
कॉपी करण्यास ‘नो चान्स’ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना कोठूनही देता येईल. मात्र, संगणक अथवा मोबाइलवर परीक्षा देताना शेवटपर्यंत कॅमेरा ऑन ठेवावा लागणार आहे. विद्यार्थी परीक्षा देताना कॅमेऱ्यात आजूबाजूला दुसरा व्यक्ती दिसला, अथवा परीक्षार्थी खुणावताना दिसला, सतत इडके-तिकडे बघितले, पेपर सोडवत असताना, मधूनच विद्यार्थी उठून गेला आदी संशयास्पद हरकतीवर विद्यापीठाची नजर (पर्यवेक्षण) राहणार आहे. विद्यापीठाकडून परीक्षार्थींचे सतत फोटो काढले जाणार आहेत. परीक्षा देताना असे गैरप्रकार समोर आले, तर त्याची पडताळणी करून दोषी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.