छत्रपती संभाजीनगर : पर्मनंट लायसन्ससाठी लर्निंग लायसन्सधारकांना वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागते आणि त्यासाठी अपाॅइंटमेंट घ्यावी लागते. मात्र, सध्या लर्निंग लायसन्सधारकांना ‘टेस्ट’ देण्यासाठी तारीखच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. वाहनाच्या ‘फिटनेस’साठीही तारीख मिळत नसल्याची ओरड वाहनधारकांमधून होत आहे.
पर्मनंट लायसन्ससाठी करोडी येथील आरटीओ कार्यालयाच्या जागेत चाचणी घेतली जाते. याच जागेत वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. आजघडीला पर्मनंट लायसन्ससाठी अपाॅइंटमेंटच मिळत नसल्याने शिकाऊ वाहनचालक त्रस्त आहेत. अपाॅइंटमेंट मिळविण्यासाठी शिकाऊ वाहनचालक आरटीओ कार्यालयात चकरा मारत आहे. अशीच काहीशी परिस्थिती वाहनाचे फिटनेस काढणे आवश्यक असलेल्या वाहनधारकांची आहे. जानेवारी सुरू होताच अपाॅइंटमेंट मिळेल, असे आरटीओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
८ अधिकारी गेले, २ आले...दीड महिन्यांपूर्वी आरटीओ कार्यालयाच्या ६ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची बदली झाली. २ जणांवर निलंबनाची कारवाई झाली, तर केवळ २ जण बदली होऊन आले. निरीक्षकांची संख्या कमी झाल्याने अपाॅइंटमेंटचा कोटा कमी करण्यात आल्याने वाहनचालकांना तारखा मिळत नाहीत.
मनुष्यबळाची कमतरतासध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे पर्मनंट लायसन्सच्या चाचणीसाठी असलेला पूर्वीचा कोटा कमी झालेला आहे. यासंदर्भात आढावा घेऊन वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर केली जाईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)