औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही, याचा शुक्रवारी निर्णय झालाच नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दलचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. या व्हिडीओ कॉन्फरन्सला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडेय आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनबाबत शुक्रवारी निर्णय होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार लॉकडाऊन लावण्यावरुन प्रशासन द्विधा मन:स्थितीत आहे.जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊनमध्ये शनिवार, रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन आहे. सोमवारी होळीच्या निमित्ताने शासकीय सुटी आहे. हे तीन दिवस वगळून एक आठवडा लॉकडाऊन करावे काय, याबाबत चर्चा सुरू आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली नाही.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाढलेले रुग्ण, त्यांचे व्यवस्थापन, पॉझिटिव्ह केसेस कमी झाल्या पाहिजेत, बेड्सची उपलब्धता याबाबत शासनाकडून विचारणा झाली. लॉकडाऊनबाबतचा निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये झाला नाही. औरंगाबाद लॉकडाऊनच्या वळणावर आहे, मात्र ते लावण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
विभागीय आयुक्त म्हणाले...विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले, आता संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. चाचणी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लॉकडाऊन करायचे की नाही, या निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी माहिती देतील.
समाजमाध्यमांतून जिल्हाधिकाऱ्यांचा संवादजिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या संदर्भाने नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक नागरिकांनी लॉकडाऊनच्या विरोधात मते व्यक्त केली. काही निवडक प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊन करायचे झाल्यास सर्व बाजूंचा विचार करण्यात येणार आहे. लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. होळी, धुळवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांना असणाऱ्या लक्षणांवर त्याला कुठे ठेवायचे, याचा निर्णय होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
अंशत: लॉकडाऊनची स्थिती अशी११ मार्चपासून ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये अशंत: लॉकडाऊन केलेले आहे. १६ मार्चच्या आदेशानुसार रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महावीर चौकातील एन. ए. प्रिंटर्स, सेव्हन हिल येथील जागृत पेट्रोल पंप व हर्सूल टी पाॅईंट येथील एच. पी. कंपनीचा पेट्रोल पंप सील करण्यात आले आहेत.