औरंगाबाद - औरंगाबादमधील कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे झालेल्या गोंधळामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांनंतर प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, औरंगाबादमध्ये अनेक चांगली कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील. असा आशावाद व्यक्त करत पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छाही व्यक्त केली.
आपल्या 325 दिवसांच्या कार्यकाळात गुन्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली असल्याचा दावा करताना ते म्हणाले, शहरात 400 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना या घटनांचा छडा लावण्यात यश आले. 125 कोटी रूपयांचा निधी शहरात सीसीटीव्हीसाठी आलेला आहे. ते काम पूर्ण करायच होते. आता नवीन अधिकारी त्या कामाला गती देतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण -
औरंगाबादमध्ये आठ तारखेला मिटमिटा गावात पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्तुतर देण्यासाठी पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांनी सार्वजनिक करून घटनेचं वास्तव जगासमोर आणलं.
पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर - औरंगाबादमधील कचराकोंडीवरून विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळताना असंवेदनशीलता दाखवत नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. तोच धागा पकडत विरोधकांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, आयुक्त यशस्वी यादव यांना आजपासूनच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. तसेच एक महिन्याच्या आत एक समिती नेमण्यात येईल व त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
विरोधकांचा सभागृहात गोंधळ -
आज सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा पर्याय यावेळी अजितदादांनी सुचवला. तसेच कचराप्रश्नावरून झालेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते. याठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.